खरीप हंगामासाठी सुलभ पीककर्ज
By Admin | Updated: June 15, 2017 00:15 IST2017-06-15T00:11:27+5:302017-06-15T00:15:28+5:30
नांदेड: खरीप हंगामासाठी दुष्काळग्रस्त असलेल्या १८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने सुलभ पीककर्ज अभियान सुरु केले

खरीप हंगामासाठी सुलभ पीककर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: खरीप हंगामासाठी दुष्काळग्रस्त असलेल्या १८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने सुलभ पीककर्ज अभियान सुरु केले असून ३० जुलैपर्यंत या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५२० कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे़ त्यासाठी तालुका आणि गावस्तरावर सुलभ पीककर्ज अभियानाची समिती गठीत करण्यात आली आहे़
खरीप हंगाम २०१७ साठी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्याची शासनाने घोषणा केली आहे़ या हंगामासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीमार्फत ५४ हजार २२० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ त्यात नांदेड जिल्ह्यातही १ हजार ५२० कोटी रुपये पीककर्ज वाटप करण्यात येणार आहे़ शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुलभरीतीने व्हावा यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे़ त्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे़
या समितीत तहसीलदार हे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बी़एल़बी़सी. आणि जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापक, निरीक्षक हे सदस्य राहणार आहेत़ याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यंत्रणेला निर्देश दिले आहेत़ या अभियानाच्या आढावा मेळाव्यात शेतकऱ्यांच्या अडचणींची गाव आणि तालुकास्तरावरच सोडवणूक केली जाणार आहे़ त्यासाठी प्रत्येक आठवड्यात तालुका समन्वय समितीने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज करण्यात येणार आहे़ मदत केंद्राच्या ठिकाणी पात्र लाभार्थी, शेतकरी यांना तलाठ्याकडून सातबारा, आठ-अ उतारा, बोझा फेरफार नोंदी व आवश्यक दस्तऐवज पुरवावे लागणार आहेत़ संबंधित मदत केंद्रावर गटसचिव व बँक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रत्येक आणि तालुका पातळीवर त्यासाठी मेळावे घेण्यात येणार आहेत़ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली़