वसुंधरेची चाळणी !

By Admin | Updated: April 3, 2015 00:44 IST2015-04-03T00:22:07+5:302015-04-03T00:44:45+5:30

बीड : पिण्यापुरतेच पाणी लागावे असे म्हणत चक्क हजार फुटापर्यंत बोअरवेल घेतले जात आहेत. पूर्वी केवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल घेतले जात होते

Earth color sieve! | वसुंधरेची चाळणी !

वसुंधरेची चाळणी !


बीड : पिण्यापुरतेच पाणी लागावे असे म्हणत चक्क हजार फुटापर्यंत बोअरवेल घेतले जात आहेत. पूर्वी केवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल घेतले जात होते. आता शहरी भागातही मोठ्या प्रमाणात बोअरवेल घेतले जात आहेत. जमीनीची होत असलेली चाळणी भविष्यासाठी घातक असल्याचे तज्ञांनी सांगितले.
पिण्यापुरतेच पाणी लागावे, अशी अपेक्षा ठेवत हजार फुटापर्यंत बोअर घेतले जात आहेत. परराज्यातून आलेल्या बोअरच्या गाड्या रात्रनदिवस सुरू असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले. मागील तीन वर्षापासून अल्प पाऊस पडत असल्याने पाणी पातळी कमालीची खालावली आहे. सिंचनाच्या कुठल्याच सुविधा प्रभावीपणे राबविलेल्या नसल्याने पाणी पातळीत वाढ होण्याचे कारण नाही. अशा स्थितीत बोअर घेण्याचा सपाटा सुरू आहे.
शिरूरमध्ये बोअर घेण्याची स्पर्धाच
शिरूर कासार तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. निदान जनावरांना पिण्यापुरते तरी पाणी बोअरला लागेल या आशेने जिल्ह्यात जणू बोअर घेण्याची स्पर्धाच लागली असून तालुक्यातील घाटशिळ पारगाव या गावातील बोअरची संख्या एक हजारच्या जवळपास पोहचली असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
परळीतील पाणी पातळी
चारशे फूट खालावली
मागील दोन वर्षात परळी तालुक्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. आज स्थितीत शहरातील गंगासागर नगर भागात ४०० फुट बोअर घेवूनही पाणी लागत नाही तर काही भागात दीडशे फुटावर देखील पाणी लागते. असे वारकरी परिषदेचे तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव आंधळे यांनी सांगितले.
गेवराईत खारे पाणी
गोदाकाठावरील गाव म्हणून गेवराईकडे पाहिले जाते. मात्र मागील तीन वर्षापासून पावसाने दडी मारल्याने येथील नदी कोरडी ठाक पडलेली आहे. परिणामी पाचशे फूट बोअर घेवूनही हाती पाणी लागत नाही. काही ठिकाणी पाणी लागले तर ते गोड पाणी लागेल याचा नेम नाही. वाड्या, तांड्यांवर दररोज बोअरची गाडी येते. जर दहा बोअर घेतले तर त्यातील सात बोअरला खारे व तीनला गोड (पिण्यास योग्य) पाणी लागते असे येथील शेतकरी ज्ञानोबा पिसे यांनी सांगितले.
दिवसाकाठी वीस बोअर
एकट्या धारूर तालुक्यात दिवसाकाठी वीसच्या जवळपास बोअर घेण्याचे प्रमाण आहे. तालुक्यात एकूण १८ च्या जवळपास बोअरच्या गाड्या आहेत. या सर्व गाड्या परराज्यातून आलेल्या आहेत. ७०० फुटापर्यंत तालुक्यात पाणी लागत नाही तरी देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात बोअर घेत असल्याचे चित्र पहावयास मिळते.
पानाड्यांचे ‘बिझी शेड्युल’
सर्व जलस्त्रोत तळाला गेले आहेत. तरी शेवटची आशा म्हणून पानाड्याच्या भरवशावर तो सांगेल त्या ठिकाणी शेतकरी बोअरवेल घेत आहेत. अनेक पानाड्यांच्या पुढील एक महिन्याच्या तारखा बुक असल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, एखाद्या गावात पानाडी आला की, अर्धे गाव त्या पानाड्याकडून आपल्या शेतातील पाण्याची चाचपणी करते. तर अनेक शेतकरी पाणी बघताच गाडी बोलावून बोअर घेतात. यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या बोअरला पाणी लागो या ना लागो. पानाड्यांची मात्र चांदी होत आहे. (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील शेतकरी विश्वबंर जगताप या शेतकऱ्याने मागील तीन वर्षात १८ एकर जमीनीत ४८ बोअरवेल घेतले. यातील तीन चार बोअरला एक ते दीड इंच पाणी लागलेले आहे. हे पाणी केवळ पाण्याची टाकी भरून घेण्यापुरतेच आहे. पाण्याच्या शोधात जगताप यांनी आठरा एकर क्षेत्राची चाळणी केली तरी देखील पाणी लागलेले नाही. एवढेच नाही तर एक बोअर चक्क १ हजार फूट घेतले. मात्र त्या बोअरला एक ठिपका देखील पाणी लागले नाही.

Web Title: Earth color sieve!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.