वॉटरकपमध्ये कमावले; ग्रामसभेत गमावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:58 IST2017-08-17T00:58:56+5:302017-08-17T00:58:56+5:30
नुकत्याच पार पडलेल्या वॉटरकप स्पर्धेत एकूण १८ लाखांचे बक्षीस मिळवून सर्वत्र कौतुक झालेल्या पठाण मांडवा येथे स्वातंत्र्यदिनी स्पर्धेनंतर प्रथमच झालेल्या ग्रामसभेत एकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

वॉटरकपमध्ये कमावले; ग्रामसभेत गमावले !
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : नुकत्याच पार पडलेल्या वॉटरकप स्पर्धेत एकूण १८ लाखांचे बक्षीस मिळवून सर्वत्र कौतुक झालेल्या पठाण मांडवा येथे स्वातंत्र्यदिनी स्पर्धेनंतर प्रथमच झालेल्या ग्रामसभेत एकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हे नोंद झाले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा या गावाने वॉटरकप स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत प्रचंड मेहनत घेत बक्षिसावर गावाचे नाव कोरले. या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येत १८ लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम प्राप्त केली. यामुळे पठाण मांडवा गावाचे सर्वत्र कौतुक झाले. परंतु, गावाला हा मान मिळाल्यानंतर जेमतेम १५ दिवसाच्या आतच या विजयाला डाग लावणारी घटना घडली आहे. पठाण मांडव्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत वादावादी होऊन एकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मन्मथ मारोती इरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ग्रामसभेत १४ वित्त आयोगातून ग्राम पंचायतीला आलेल्या निधीच्या विनियोगाबद्दल तसेच घरकुलासंदर्भात कथितरीत्या सुरु असलेल्या दिशाभुलीबद्दल प्रश्न विचारले. फेरफार आकारणी कोणालाही विश्वासात न घेता आॅनलाईन कशी काय टाकली याबाबतही प्रश्न विचारले. यावर प्रमोद प्रल्हाद गुजर, नितीन सोमनाथ रूद्राक्ष आणि महालिंग बाळासाहेब रूद्राक्ष या तिघांनी चिडून तू नेहमी याच विषयांवर चर्चा का करतोस असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर याविषयी काही विचारलेस तर तुला जिवंत सोडणार नाहीत, अशी धमकी दिल्याचेही मन्मथ इरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.