कारमधून आठ लाख रुपयांची रक्कम ताब्यात
By Admin | Updated: October 6, 2014 00:44 IST2014-10-06T00:30:50+5:302014-10-06T00:44:09+5:30
औरंगाबाद : निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने रविवारी दुपारी जळगाव रोडवर वाहनांच्या तपासणीदरम्यान हुंडाई कारमधून आठ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली.

कारमधून आठ लाख रुपयांची रक्कम ताब्यात
औरंगाबाद : निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने रविवारी दुपारी जळगाव रोडवर वाहनांच्या तपासणीदरम्यान हुंडाई कारमधून आठ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. कारमधील ही रक्कम निवडणुकीत वापरण्यासाठी जात असावी, असा संशय आल्याने भरारी पथकाने ही कारवाई केली. पुढील चौकशीसाठी ही रक्कम पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील निवडणूक विभागाचे भरारी पथक रविवारी जळगाव रोड येथे वाहनांची तपासणी करीत होते. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या एका हुंडाई कारची तपासणी केली असता त्यात आठ लाख रुपयांची रक्कम आढळून आली. पथकातील अधिकाऱ्यांनी कारमधील शेळके (रा. हडपसर, पुणे) यांच्याकडे याविषयी अधिक चौकशी केली.
शेळके ही रक्कम खाजगी कामासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले; पण त्या रकमेविषयी कोणतीही कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पथकप्रमुख ठाकूर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांच्याशी संपर्क साधला. कारले यांनी लगेच ही रक्कम पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या.