२० जूननंतर उघडणार ई-निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 00:48 IST2015-06-16T00:35:25+5:302015-06-16T00:48:10+5:30

जालना : शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या ई-निविदा २० जून नंतर उघडण्यात येणार आहेत.

E-tendering to open after June 20 | २० जूननंतर उघडणार ई-निविदा

२० जूननंतर उघडणार ई-निविदा


जालना : शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या ई-निविदा २० जून नंतर उघडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी निविदा पूर्व बैठकीस एकाही इच्छुक कंत्राटदाराने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या ई-निविदेकडे लागले आहे.
जानेवारी २०१५ मध्ये नगरविकास खात्याकडून बीओटी तत्वावर या इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. नगरपालिकेच्या मालकीची ही इमारत अत्यंत जीर्ण झाल्यामुळे २००५-०६ मध्ये पाडण्यात आली होती.
सुरूवातीला व्यापाऱ्यांचा विरोध, त्यानंतर त्यांची संमती, व्यापाऱ्यांचे इतरत्र स्थलांतर या बाबींमध्ये काहीवेळ गेला. त्यानंतर या ठिकाणी नवीन इमारत तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र गेल्या आठ वर्षांपासून इमारतीच्या बांधकामास तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. विभागीय आयुक्त कार्यालयात यासंबंधीची संचिका दीर्घकाळ प्रलंबित होती.
फुले मार्केटची नवीन इमारत केव्हा होणार, याविषयीची शहरातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणताही निर्णय होत नसल्याने या इमारतीच्या बांधकामला मुहूर्त केव्हा लागणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.
नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर आता ई-निविदा प्रसिद्ध झाल्याने आगामी दीड महिन्यांच्या कालावधीनंतर प्रत्यक्षात कामास सुरूवात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, निविदा पूर्व बैठकीस एकाही कंत्राटदाराने हजेरी लावली नव्हती.
आता ई-निविदा २० जूननंतर उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी दोन महिन्यात काम सुरू होईल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: E-tendering to open after June 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.