उतारवयात 'ई-मेल' ची सक्ती; जेष्ठ नागरिकांना करकपातीचा आॅनलाईन अर्ज भरणे ठरतेय त्रासदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 20:31 IST2018-04-10T20:26:49+5:302018-04-10T20:31:38+5:30
‘डिजिटल इंडिया’चे वारे देशभरात जोरात वाहत असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मात्र या सर्व गोष्टी अडचणीच्या आणि त्रासदायक वाटत आहेत.

उतारवयात 'ई-मेल' ची सक्ती; जेष्ठ नागरिकांना करकपातीचा आॅनलाईन अर्ज भरणे ठरतेय त्रासदायक
औरंगाबाद : ‘डिजिटल इंडिया’चे वारे देशभरात जोरात वाहत असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मात्र या सर्व गोष्टी अडचणीच्या आणि त्रासदायक वाटत आहेत. १५ एच या अर्जासाठी स्वत:चा ई- मेल असणे आवश्यक झाल्यामुळे आता उतारवयात हा ‘आॅनलाईन’ अर्ज भरणे ज्येष्ठांसाठी जिकिरीचे ठरतेय.
निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना करकपातीची सवलत मिळण्यासाठी १५ एच हा अर्ज भरावा लागतो. यंदा हा अर्ज आॅनलाईन स्वरूपातच भरण्यात यावा, असे आदेश रिझर्व्ह बँकेकडून सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले आहेत. यानुसार आता हा अर्ज भरावयाचा असेल तर ज्येष्ठांनी त्यांचा ई- मेल आयडी बँकेत नोंदविणे गरजेचे आहे. मेल आयडीची बँकेत नोंद केल्यानंतर त्या मेल आयडीवरच ज्येष्ठांना १५ एच फॉर्म पाठविण्यात येईल. त्यानंतर ज्येष्ठांनी हा फॉॅर्म आॅनलाईन भरूनच पाठवायचा आहे.
ई- मेल आयडी तयार करणे ज्येष्ठांना जिकरीचे वाटत असेल, तर नेट कॅफे येथे जाऊन ज्येष्ठांनी आयडी तयार करावा आणि बँकेत नोंद करावा, असे अनेक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, बँकेच्या या कामासाठी आम्ही आमचा ई- मेल आयडी तयार केला तरी आलेला ई- मेल पाहण्यासाठी आमच्याकडे संगणक नाही, अशी अडचण काही ज्येष्ठांनी सांगितली. उतारवयात आम्हाला संगणक हाताळणेही जिकरीचे वाटते. आमच्यापैकी बहुतांश लोकांकडे त्यांचे ई- मेल आयडी नाहीत. त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठी अडचणीची ठरत असून, निदान ज्येष्ठांसाठी तरी या नियमात बदल करावा, अशी अपेक्षा ७८ वर्षीय निवृत्ती वेतनधारक शांतीलाल सुरेका यांच्यासह अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केली.
बँकांमध्ये संगणक सहायता कक्ष हवा
७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांच्या नोकरीच्या काळात मोठ्या प्रमाणावर संगणक क्रांती झालेली नसल्यामुळे या ज्येष्ठांना संगणक वापरण्याची भीती वाटते. याशिवाय या वयात अशा तांत्रिक गोष्टी शिकून त्या आत्मसात करण्याची ज्येष्ठांची क्षमताही कमी होत जाते.
ही गोष्ट समजून घेऊन अर्ज आॅनलाईन पद्धतीनेच भरावयाचा असेल तर ज्येष्ठांसाठी बँकांमध्ये सहायता कक्ष स्थापन करून तेथे त्यांचा ई-मेल आयडी तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही पुढे येत आहे.