दुसरीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे
By Admin | Updated: September 18, 2014 00:40 IST2014-09-18T00:36:07+5:302014-09-18T00:40:27+5:30
लातूर : लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सदरील उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला.

दुसरीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे
लातूर : लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सदरील उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ई-लर्निंगची ओळख झाल्यानंतर आता दुसरीच्या विद्यार्थ्यांनाही याच पद्धतीने शिक्षण देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
ठाणे येथील लर्निंग स्पेस फाऊंडेशन संस्थेने लातूर जिल्ह्यातील जवळपास बाराशेहून अधिक जिल्हा परिषद शाळांना मोफत डीव्हीडींचे वाटप केले. मनोरंजनातून शिक्षण घेण्याची अनोखी पद्धत या संस्थेने डीव्हीडीच्या माध्यमातून पुढे आणली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात गतवर्षी बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून धडे देण्यात आले. लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धन्वंतकुमार माळी यांनी पुढाकार घेऊन हाती घेतलेला हा ई-लर्निंगचा उपक्रम लातूर तालुक्यात शंभर टक्के शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे.
दगडोजीराव देशमुख सभागृहात ठाणे येथील स्वयंसेवी संस्थेचे प्रकल्प प्रमुख मनीष धिमान, संशोधन सहाय्यक रविंद्र जाधव, तुषार पाटील यांनी ई-लर्निंगचे धडे दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत, शिक्षणाधिकारी राठोड, वाघमारे, गटविकास अधिकारी धन्वंतकुमार माळी यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भडी, कातपूर, गातेगाव, मुरुड (पारु नगर), भोयरा येथील शाळांना भेटी देऊन ई-लर्निंगद्वारे देण्यात येत असलेल्या शिक्षणाची पद्धत बुधवारी संस्थेच्या समन्वयकांनी जाणून घेतली. मनोरंजनातून शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होऊन साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रकल्प प्रमुख मनीष धिमान यांनी सांगितले.