ग्रामपंचायतींमधून ई-बँकिंग सुविधा

By Admin | Updated: February 5, 2017 23:26 IST2017-02-05T23:25:11+5:302017-02-05T23:26:15+5:30

बीड ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत स्तरावर ई-बँकिंग सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे.

E-banking facility in Gram Panchayats | ग्रामपंचायतींमधून ई-बँकिंग सुविधा

ग्रामपंचायतींमधून ई-बँकिंग सुविधा

संजय तिपाले  बीड
पंचायत राज संस्थांच्या कारभारात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने एक पाऊल पुढे टाकीत ग्रामपंचायत स्तरावर ई-बँकिंग सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६३५ ठिकाणी ही केंद्रे निर्माण होत असून, यातून रेल्वे तिकिटापासून ते वीज बिल अदा करण्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
जिल्ह्यात १ हजार २३ ग्रामपंचायती असून, सर्वसाधारणपणे १५ लाख रुपये व त्यापेक्षा अधिक निधी प्राप्त असलेल्या ग्रा.पं.मध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याकरिता जिल्ह्यातील ६३५ ग्रामपंचायतींनी तयारी दर्शविली असून, त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाशी करार झालेल्या खाजगी कंपनीने ५९८ संगणक परिचालकांची याकामी नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्येच ही ई-केंद्र सुरू होत असून, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा आदी साधनसामग्री ग्रा.पं.ने स्वनिधीतूृन उपलब्ध करून द्यायची आहेत.
दरम्यान, ही केंद्रे फेब्रुवारी अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जि.प. प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १८ व १९ जानेवारी रोजी बीड येथे बँक प्रतिनिधींमार्फत विस्तार अधिकारी (पंचायत) यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
या सुविधांमुळे गावकऱ्यांना शहराच्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही, असे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले.

Web Title: E-banking facility in Gram Panchayats