‘ड्युरोव्हॉल्स’कामगारांनी नाकारली मिठाई
By Admin | Updated: October 27, 2016 00:58 IST2016-10-27T00:45:43+5:302016-10-27T00:58:48+5:30
औरंगाबाद : दिवाळीनिमित्त व्यवस्थापनाने देऊ केलेली मिठाई व्हेरॉक ग्रुपशी संबंधित असणाऱ्या ड्युरोव्हॉल्स कंपनीतील कामगारांनी बुधवारी नाकारली.

‘ड्युरोव्हॉल्स’कामगारांनी नाकारली मिठाई
औरंगाबाद : दिवाळीनिमित्त व्यवस्थापनाने देऊ केलेली मिठाई व्हेरॉक ग्रुपशी संबंधित असणाऱ्या ड्युरोव्हॉल्स कंपनीतील कामगारांनी बुधवारी नाकारली. नवीन अध्यादेशानुसार व्यवस्थापनाने वाढीव बोनस न दिल्यास कंपनीच्या गेटवर दिवाळी साजरी करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ड्युरोव्हॉल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीत दोन कामगार संघटना अस्तित्वात आहेत. ड्युरोव्हॉल्स केजरीवाल एम्प्लॉईज युनियन या अंतर्गत संघटनेचे १७६ कर्मचारी सभासद आहेत, तर पँथर पॉवर कामगार संघटनेच्या सभासदांची संख्या ४१ आहे. बोनसबाबत चर्चेसाठी व्यवस्थापन आणि संघटना यांच्यात बुधवारी बैठक होणार होती; परंतु व्यवस्थापनाने बैठक बोलावली नाही.
या प्रश्नावर गुरुवारी बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष रघुनाथ साबळे यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर बोनसचा प्रश्न सोडविण्याबाबत व्यवस्थापनाने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. या भूमिकेच्या निषेधार्थ मिठाई घेण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला.
नवीन बोनस कायद्यानुसार २४ हजार रुपयांचा बोनस द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे, तर १०,२०० रुपयांपेक्षा जास्त बोनस दिला जाणार नाही, अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात कंपनीला मोठा नफा झाला असून, त्या आधारावर बोनस देण्याची संघटनेची मागणी आहे.