बंदोबस्तातील पोलिस कर्मचाऱ्यांना दिला ड्युटीपास
By Admin | Updated: August 31, 2014 00:09 IST2014-08-30T23:34:47+5:302014-08-31T00:09:45+5:30
परभणी : गणेशोत्सव काळात ड्युटीवर तैनात केलेल्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांस ड्युटीपास देण्यात आले

बंदोबस्तातील पोलिस कर्मचाऱ्यांना दिला ड्युटीपास
परभणी : गणेशोत्सव काळात ड्युटीवर तैनात केलेल्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांस ड्युटीपास देण्यात आले असून, या माध्यमातून बंदोबस्तात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी केला आहे.
२९ आॅगस्टपासून जिल्ह्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गणेशोत्सव आणि यासारख्या इतर उत्सवांमध्ये जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी पोलिस प्रशासनावर येऊन पडते. उत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे उत्सव काळात गर्दी वाढते आणि त्याचा फायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. उत्सव कालावधीत कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांततेच्या वातावरणात हा उत्सव साजरा करता यावा, यासाठी पोलिस प्रशासन दरवर्षी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावतो. तसेच काही प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाते.
यावर्षी गणेशोत्सवासाठी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस दलातील ८० टक्के पोलिस बळाबरोबरच बाहेर जिल्ह्यातूनही पोलिस बळ मागविण्यात आले आहे.
या पोलिस बलाला ड्युटीचे नियोजन करुन देण्यात आले असून, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. याउपरही पोलिस बंदोबस्तात सुसुत्रता आणण्यासाठी यावर्षी ‘ड्युटी पास’ची संकल्पना राबविण्यात आली आहे. अकरा दिवसांचा हा ड्युटी पास असून, तो प्रत्येक कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे या बंदोबस्तात आणखी सुसुत्रता आणण्यास मदत होणार आहे. शिवाय प्रत्येक कर्मचाऱ्यांचा दहा दिवसांचा लेखाजोखा या ड्युटीपासमध्ये मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना हा ड्युटीपास देण्यात आला. प्रत्येक बाबीने परिपूर्ण असा ड्युटीपास तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे. यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन देण्यात आली आहे. तसेच कुठली परिस्थिती कशा पद्धतीने हाताळयाची याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऐनवेळी कोणाशी संपर्क करावयाचा झाल्यास जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांकही यात देण्यात आले आहेत.
अशी केली बंदोबस्ताची विभागणी
जिल्हा पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी गणपती मंडळाचे संरक्षण, फिक्स पॉर्इंट आणि पेट्रोलिंग अशा तीन टप्प्पायत बंदोबस्ताची विभागणी केली आहे. या तिन्ही विभागात कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करायचे याच्या सूचनाही पासमध्ये देण्यात आल्या. तसेच श्री गणेश प्रतिष्ठापना ते गणेश विसर्जनापर्यंत चेकींग अधिकाऱ्याची सही व शेरा असलेला तक्ताही या पासमध्ये देण्यात आला आहे.