दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
By Admin | Updated: December 25, 2015 00:06 IST2015-12-24T23:43:00+5:302015-12-25T00:06:14+5:30
औरंगाबाद : ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा नामघोष सुरू असताना श्रीदत्ताचा जन्म झाला आणि मंदिरामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला,

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
औरंगाबाद : ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा नामघोष सुरू असताना श्रीदत्ताचा जन्म झाला आणि मंदिरामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, मंगलवाद्य वाजविले गेले आणि फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. श्रीदत्ताच्या विलोभनीय मूर्तीकडे पाहून सर्व जण नतमस्तक झाले. ‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन’, अशीच प्रत्येक भाविकाची भावना झाली होती.
श्रीदत्त जयंतीनिमित्त असे भारावून टाकणारे वातावरण बीड बायपास रोडवरील संत काशी विश्वनाथबाबा संस्थानच्या दत्त मंदिरात भाविकांनी अनुभवले.
शहरातील सर्व श्रीदत्त मंदिरात जयंती साजरी करण्यात आली. काही ठिकाणी दुपारी १२.३० वाजता तर काही ठिकाणी ६.३० वाजता श्रीदत्त जन्म उत्सव साजरा करण्यात आला होता. बीड बायपास रोडवरील दत्त मंदिर परिसराला जणू जत्रेचे स्वरूप आले होते. मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या... गणपती, रेणुकामाता, श्रीदत्त आणि सुवर्ण पादुकांची षोडशोपचार पूजा व अभिषेक करण्यात आला. यानंतर संत काशी विश्वनाथबाबांच्या मूर्ती स्थापनेचा १६ वा वर्धापन दिन झाला. समोर चांदीचा पाळणा ठेवण्यात आला होता. संतोष डासाळकर गुरुजी पाळणा हलवीत होते. शेकडो भाविक ‘दिगंबरा, दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा नामघोष करीत असतानाच घड्याळात दुपारचे १२ वाजले आणि उपस्थितांनी एकच जयघोष केला. यानंतर संस्थानचे अध्यक्ष सोपानराव देशमुख यांनी आरती केली. यावेळी लक्ष्मीनारायण अट्टल, रामकृष्ण वाघ आदी पदाधिकारी हजर होते.
जागृत दत्त मंदिर
गाणगापूरच्या धर्तीवर सिडको एन- ७ येथील जागृत दत्त मंदिरात श्रीदत्त जयंती साजरी करण्यात आली. भगवंतांच्या मूर्तीसमोर ५६ भोग नैवेद्याची आरास तयार करण्यात आली होती. दुपारी ४.३० वाजता कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर यांच्या श्रीदत्त जन्मावरील कीर्तनाला भाविकांनी गर्दी केली. महिलांनी पारंपरिक पाळणा गीते म्हटली आणि भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सोहळा यशस्वीतेसाठी गणेश जोशी, संतोष लगामे, राजेश इंजे पाटील, पद्माकर दिवाण, रत्नाकर दिवाण आदींनी परिश्रम घेतले. रात्री परिसरातून पालखी काढण्यात आली. पौरोहित्य उद्धवशास्त्री वझूरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
औरंगपुऱ्यातील सर्वात जुन्या दत्त मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
दुपारी येथे पाठक गुरुजींचे कीर्तन झाले आणि सायंकाळी दत्त जन्मोत्सवानिमित्त बंडू पुजारी गुरुजी, मधुकर पुजारी, दीपक पुजारी, अमित पुजारी, महेश पुजारी आदींनी आरती केली आणि श्रीदत्त जयंती साजरी करण्यात आली. रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.