श्रावणानिमित्त नर्सीत परिसरात ‘फत्तेपुरी’
By Admin | Updated: August 23, 2014 00:46 IST2014-08-23T00:16:36+5:302014-08-23T00:46:43+5:30
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी व परिसरात श्रावण महिन्यानिमित्ताने तरुण, वयस्कर मंडळी एकत्र येत शेतात वनभोजन करताना दिसत आहे.

श्रावणानिमित्त नर्सीत परिसरात ‘फत्तेपुरी’
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी व परिसरात श्रावण महिन्यानिमित्ताने तरुण, वयस्कर मंडळी एकत्र येत शेतात वनभोजन करताना दिसत आहे. या मेजवानीत गूळ, तुप, गव्हाची भाकरी एकत्र करुन मलिदा तयार केला जातो. विशेषत: या कार्यक्रमात पुरूष मंडळी स्वत:च ही कामे करत असतात. महिलांना या कार्यक्रमात सहभागी करीत नाहीत.
पूर्वीपासून गावाबाहेरील शेतात, माळरानावर गावातून आबालवृद्ध एकत्रित येवून फत्तेपुरी म्हणून कार्यक्रम करतात. बाल- गोपाळ एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात. काही वडीलधाऱ्या मंडळींना विचारले असता पूर्वी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असे. त्यामुळे गावात घरोघरी माशांच्या प्रमाणात वाढ होत असे. त्यामुळे अतिसार आजाराचे प्रमाण वाढत होते. तेव्हा दवाखानेही कमी प्रमाणात होते. म्हणून गावाबाहेर माळरानावर हा गोड मेवा साजरा करीत होते. पूर्वीचीच प्रथा आजही सुरूच आहे. या प्रथेस ‘फत्तेपुरी’ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. आज या कार्यक्रमास धार्मिक कार्य म्हणून प्रसिद्धी आहे. धार्मिक व वैज्ञानिक दृष्टीने स्वत: तयार करून वन भोजनाचा खरा आनंद मिळतो. आपसातील वैर दूूर सारून एकत्र जमण्याचा आणि एकतेचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)