नोटिसा वाटप करताना पोलिसांची अशीही पदरमोड
By Admin | Updated: October 19, 2016 01:12 IST2016-10-19T00:54:43+5:302016-10-19T01:12:34+5:30
औरंगाबाद : शहरातील विविध चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियम भंग करून पळणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र

नोटिसा वाटप करताना पोलिसांची अशीही पदरमोड
औरंगाबाद : शहरातील विविध चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियम भंग करून पळणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र त्याच्या वाहनासह सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळवून वाहनमालकास घरपोच नोटिसा पाठविण्यात येत आहेत. हा स्तुत्य उपक्रम राबविताना मात्र, वाहनचालकास घरपोच दंडाच्या नोटिसा देणाऱ्या पोलिसांची चांगलीच दमछाक होत असल्याचे समोर आले आहे. या पोलिसांना ना सरकारी वाहन देण्यात आले, ना इंधन. परिणामी पदरमोड करून त्यांना वाहनचालकांना घरपोच नोटिसा पोहोचाव्या लागत आहेत.
औरंगाबाद शहरातील प्रमुख जालना रोड, गजानन महाराज मंदिर चौक, शहानूरमियाँ दर्गा चौक, रेल्वेस्टेशन आदी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस आयुक्त कार्यालयात आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात केलेले असतात. असे असताना काही वाहनचालक कधी पोलिसांची नजर चुकवून तर कधी त्यांच्या डोळ्यासमोर वाहतूक सिग्नल तोडून पळतात. रिक्षाचालकही फं्रट सीटवर प्रवासी बसवितात, विचित्र नंबर प्लेट टाकून वाहतूक नियमांचा भंग करण्यात येतो.
नियमभंग करणाऱ्या अशा वाहनांचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपल्या जाते. त्यानंतर छायाचित्रातील वाहनांच्या नंबरवरून वाहनमालकाचे नाव आणि पत्ता प्राप्त करून नोटीस तयार करण्यात येते. ही नोटीस वाहनमालकाच्या पत्त्यावर घरपोच देऊन त्यांच्याकडून जागेवर दंडाची रक्कम वसूल करण्यात येते अथवा त्या वाहनचालकास दंडाची रक्कम मान्य नसेल तर त्यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात येतो. सुमारे ८ महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला. या नोटिसा वाटप करणाऱ्या वाहतूक पोलिसांना दुचाकी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना स्वखर्चातून दुचाकीत इंधन टाकावे लागते.