दारणा धरणातून विसर्ग वाढविला
By Admin | Updated: August 2, 2016 00:26 IST2016-08-02T00:19:37+5:302016-08-02T00:26:05+5:30
औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणांतून खाली पाणी सोडण्यात आले आहे.

दारणा धरणातून विसर्ग वाढविला
औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणांतून खाली पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी दारणातून सोडण्यात आलेला पाच हजार क्युसेक्सचा विसर्ग सोमवारी ११६८८ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. तसेच गंगापूर धरणातूनही ३६४७ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी उद्या मंगळवारी जायकवाडीत दाखल होईल, अशी माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली.
जायकवाडीच्या वरच्या भागात नाशिक जिल्ह्यातील धरणे ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. शिवाय गेल्या दोन तीन दिवसांपासून तेथे आणखी पाऊस होतो आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गंगापूर आणि दारणा धरणांतून खाली पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी दारणा धरणातून ५ हजार क्युसेक्सने आणि गंगापूर धरणातून २७४० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी दारणा धरणातून ११६८८ आणि गंगापूर धरणातून ३६४७ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. या दोन्ही धरणांतून सुमारे पंधरा हजार क्युसेक्सने नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यात पाणी येत आहे.
बुधवारी येणार जिवंत साठ्यात...
कडाचे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी सांगितले की, वरच्या भागातील धरणांमधून सोडलेले पाणी अद्याप नागमठाणपर्यंत पोहोचले नाही. तेथून ते जायकवाडीत पोहोचेल.
मात्र, आता वरच्या भागातून सुमारे साडेअकरा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ते पाणी पोहोचल्यावर जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. सध्या जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. ते जिवंतसाठ्यात येण्यासाठी २० दलघमीची गरज आहे. वरचे पाणी दाखल झाल्यास बुधवारीच हे धरण जिवंतसाठ्यात येण्याची शक्यता आहे.