डमी वेबसाइट; बेरोजगार लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:36+5:302021-07-14T04:07:36+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेले लॉकडाऊन रोजगाराच्या जिवावर उठले आहे. अनेक रोजगारक्षम उद्योग व्यवसायांची दैना झाली असून ...

Dummy website; Unemployment target | डमी वेबसाइट; बेरोजगार लक्ष्य

डमी वेबसाइट; बेरोजगार लक्ष्य

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेले लॉकडाऊन रोजगाराच्या जिवावर उठले आहे. अनेक रोजगारक्षम उद्योग व्यवसायांची दैना झाली असून कॉस्टकटिंगमुळे बेरोजगारी वाढू लागली आहे. तर नवीन उद्योग गुंतवणुकीस पुढे येत नसल्यामुळे छुपी बेरोजगारी वाढते आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बेरोजगारांना ऑनलाइन गंडविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

कोरोनामुळे दीड वर्षांपासून बहुतांश व्यवहार ऑनलाइन होत असल्यामुळे दैनंदिनीची सुरुवातच मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड हाताळण्यापासून होत आहे. कामासोबत इंटरनेट सर्फिंग करताना डमी वेबसाइटवर अनेकांची नजर जाते, काहीजण दुर्लक्ष करतात, तर काही त्या वेबसाइटच्या प्रलोभनास बळी पडून आर्थिक फसवणूक करून घेतात.

कोरोनाच्या काळात वर्कफ्रॉम होमचा ट्रेंड

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर बहुतांश उद्योग-व्यवसायात वर्कफ्रॉर्म होमचा ट्रेंड आला. याच काळात अनेक कंपन्यांनी, संस्थांच्या डमी जाहिरात सोशल मीडियातून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन केवायसी भरून देण्यात त्रुटी असल्याचे सांगून बेरोजगारांना गंडविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

ऑनलाइन ऑफरची अशी करा खातरजमा

ऑनलाइन नोकरीची ऑफर आल्यास कामाचे स्वरूप काय आहे. किती काम करावे लागेल. याबाबत स्पष्टता तपासा. कंपनीची पूर्ण माहिती संकलित करा. त्यातील अटी व शर्ती पूर्णपणे वाचून घ्या. केवायसीच्या नावाने डॉक्युमेंट घेत असताना काळजीपूर्वक माहिती घ्या. करार करण्यापूर्वी ऑनलाइन ऐवजी समक्षपणे भेटूनच चर्चा करा.

१ संकेतस्थळाची इंटरनेटवरून जास्तीत जास्त माहिती मिळवा.

२ ज्या लिंक्स कधीही पाहण्यात आल्या नाहीत, त्यावर क्लिक करू नका.

३ अँटिव्हायरसद्वारे धोकादायक आणि डमी लिंक्स ब्लॉक करा.

अशी होऊ शकते फसवणूक.

१) ऑनलाइन जॉब ऑफर म्हणजे सायबर फसवणुकीचा हा प्रकार असू शकतो. यामध्ये डाटा एन्ट्री किंवा टायपिंगचे काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखविले जाते. अशा ऑफर देणाऱ्या कंपन्यांची जाहिराती फेक असू शकतात.

२) सुरुवातीला काही कामाचे पैसे दिले जातात. मात्र नंतर कामात चुका झाल्या, त्यामुळे काम रिजेक्ट झाले आहे. तसेच कंपनीचे नुकसान झाले आहे. गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैसे उकळले जातात. यात अनेक बेरोजगार फसतात.

दोन तक्रारी झाल्या आहेत दाखल

ऑनलाइन जॉब देण्याच्या जाहिरातींमधील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचव्यात. सायबर सेलकडे फसवणुकीच्या दोन तक्रारी सध्या दाखल असून, मागील वर्षभरात अशा फसवणुकीचा ट्रेंड आला आहे. ऑनलाइन केवायसी अर्ज केल्यानंतर त्यात त्रुटी दाखवून बेरोजगारांना संस्थांकडून ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा जाहिरातींची खातरजमा करणे गरजेचे आहे.

गीता बागवडे

पोलीस निरीक्षक सायबर सेल, पोलीस आयुक्तालय

( डमी स्टार ९१६)

Web Title: Dummy website; Unemployment target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.