थकीत रक्कमेवरून वीज वितरण कंपनी व नगर पालिकेत द्वंद्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 16:34 IST2017-08-03T16:33:52+5:302017-08-03T16:34:49+5:30
नगर पालिकेकडे वीज वितरणचे ७ लाख रुपये थकीत आहेत. या वसुलीसाठी वीज वितरणने पालिकेची ३ दिवसापूर्वी वीज कापली आहे. या विरोधात आता पालिकेने विविध करांपोटी कंपनीवर जवळपास पावने दोन कोटींची बाकी काढत नोटीस बजावली आहे.

थकीत रक्कमेवरून वीज वितरण कंपनी व नगर पालिकेत द्वंद्व
ऑनलाईन लोकमत
माजलगांव ( जि. बीड ), दि. ३ : माजलगांव नगर पालिकेकडे वीज वितरणचे ७ लाख रुपये थकीत आहेत. या वसुलीसाठी वीज वितरणने पालिकेची ३ दिवसापूर्वी वीज कापली आहे. या विरोधात आता पालिकेने विविध करांपोटी कंपनीवर जवळपास पावने दोन कोटींची बाकी काढत नोटीस बजावली आहे.
जिल्ह्यात माजलगांव नगर पालिका कायम चर्चेत असते. यावेळी चर्चा आहे वीज वितरण कंपनीने पालिकेच्या खंडित केलेल्या सेवेची. पालिकेच्या विविध विभागांकडे वीज वितरणची ७ लाखाची थकबाकी आहे. कंपनीने धडक कारवाई करत पाणी पुरवठा विभागाच्या फिल्टरसह कार्यालयातील विजपुरवठा खंडीत केला आहे. परंतु; शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवु नये म्हणुन पालिकेच्या बाकी भरण्याच्या आश्वासनवर फिल्टरवरील विजपुरवठा सुरु केला. मात्र, कार्यालयाचा विजपुरवठा अद्यापही खंडीतच आहे.
पालिकेने २ वर्षांपूर्वी ५ लाख रुपये वीज बिल थकबाकी असतांना केवळ २ लाख रुपये भरले होते. हि बाकी वाढत जाऊन आता जवळपास ७ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. अनेकवेळा सांगुन देखील बिलाची रक्कम न भरल्यामुळे शेवटी कंपनीने विजपुरवठा खंडीत केला.
कंपनीने कार्यालयाचा विजपुरवठा खंडीत केल्यानंतर पालिका प्रशासन हि आता खडबडून जागी झाले आहे. पालिकने कंपनीस विविध करांपोटी सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांच्या बाकीची नोटीस दिली आहे. कर भरा अन्यथा कंपनीचे कार्यालय सिल करण्याचे यात म्हटले आहे. यामुळे वीज वितरण कंपनी आणि पालिका यांच्यात थकीत रक्कमेपोटी चांगलेच द्वंद्व पहायला मिळत आहे.
खाजगी विजधारकाचा आधार
तीन दिवसांपासुन विज पुरवठा खंडीत असल्यामुळे पालिकेने दैनंदिन कामकाजासाठी इमारतीच्या शेजारील एका खाजगी घरातुन विज पुरवठा घेतला आहे.
कंपनीच्या कार्यालयास सील ठोकणार
पालिकेकडे वीज बिलापोटी असलेली थकीत रक्कम व पालिकेची कंपनीकडे असलेली करापोटी थकीत रक्कम यात मोठी तफावत आहे. कंपनीने आमच्या कार्यालयाची बाकी भरुन घ्यावी व उर्वरित रक्कमेचा भरणा करावा. अन्यथा कंपनी कार्यालयाल सिल ठोकण्यात येईल. - बी. सी. गावित, मुख्याधिकारी
थकीत बिलामुळे केली कारवाई
पालिकेला दोन वर्षांपासून विजबिल भरण्या बाबत अनेकवेळा नोटीस दिली आहे. तरीही बाकी न भरल्यामुळे आम्ही विज पुरवठा खंडीत केला. - सी. एम. चौधरी, कनिष्ठ अभियंता