महिला बचत गटांमुळे गावे बनताहेत सावकारीमुक्त
By Admin | Updated: June 10, 2014 00:18 IST2014-06-09T23:55:28+5:302014-06-10T00:18:11+5:30
भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव स्वयंसहायता बचत गट हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक फार मोठे प्रभावी माध्यम ठरले आहे. महिलांसाठी स्वयंरोजगाराचे दालन खुले झाल्याने या माध्यमातून मोठी क्रांती झाली.
महिला बचत गटांमुळे गावे बनताहेत सावकारीमुक्त
भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव
स्वयंसहायता बचत गट हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक फार मोठे प्रभावी माध्यम ठरले आहे. महिलांसाठी स्वयंरोजगाराचे दालन खुले झाल्याने या माध्यमातून मोठी क्रांती झाली. त्यापाठोपाठ स्थापन झालेल्या पुरूषांच्या शेतकरी बचत गटांनी आर्थिक बचत करतानांच कर्जपुरवठा केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव परिसरातील अनेक गावे सावकारीमुक्त होत आहेत.
बँकाकडून वेळेवर आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात. अस्मानी किंवा सुलतानी संकटामुळे पीक चांगले आले नाही, पिकाला बाजारात भाव मिळाला नाही तर शेतकऱ्याला कर्ज फेडणे अवघड जाते. त्यामुळे हाच शेतकरी हतबल होऊन आत्महत्येचा पर्याय स्वीकारतो. यातून शेतकऱ्यांसाठी मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील काही पुरूष बचत गटांनी केला आहे.
हिंगोली तालुक्यातील अनेक गावांत स्वर्णजयंती महिला बचतगट अभियानांतर्गत गटांची स्थापना झाली आहे. त्यातून शेकडो महिला एकत्रित आल्या. बचतीची चांगली सवय लागली. पाच वर्र्षांपूर्वी बचत गटाच्या कार्यास चांगली गती मिळाली. नर्सी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत ६५ महिला बचत गटांचे खाते आहे. त्यामुळे महिन्याला जवळपास ४ लाखांची बचत करण्यात येते. त्यापैकी ९ महिला बचत गटांस २० लाखांची रक्कम देण्यात आली आहे. त्यातून काही गटांनी शेळी पालन, फडे-टोपले तयार करणे, फळाचे दुकान, फोटो लॅमीनेशन करणे, दाराचे पडदे, ताट-झाकनाचे विणकाम, राखी बनविणे असे उद्योग केले आहेत. त्यातून गटांना चांगले उत्पन्नाचे साधन सापडले व बँकेचे कर्जही नियमित भरणा करीत राहिल्याने महिला सक्षम बनू लागल्या, असे बँकेचे शाखाधिकारी व्ही. एस. शिंदे यांनी सांगितले. मराठवाडा ग्रामीण बँकेत ३५ गटांचे व्यवहार सुरू आहेत. त्यातून दरमहा ३ ते ४ लाखांचा व्यवहार होतो. १५ महिला बचत गटास या शाखेतून ३५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती शाखाधिकारी एस. पी. खंडेतोड यांनी दिली. महिलांना बचतीची चांगली सवय लागली आहे. महिला बँकेत येत असल्याने त्यांना कामाची माहिती होवू लागली. पूर्वी आषाढ महिना आला की, शेतकऱ्यांना पेरणीसाठी सावकारांचे दरवाजे झिजवावे लागत होते. त्यांच्या व्याजदरात शेतकरी पूर्णपणे नागविला जायचा; परंतु या बचत गटांच्या माध्यमातून व्यवहार होवून सावकारीस आळा बसला असल्याचे चित्र नर्सी परिसरात पहावयास मिळत आहे. या भागात शेतकऱ्यांनीही आपले गट तयार करून लाखो रूपयांची उलाढाल करीत १ टक्के व्याजदाराने कर्ज पुरवून आपला गाव सावकारीमुक्त केला आहे.
सावकारी पाशाने आजवर हजारो शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातील नर्सी परिसरातील शेतकरीही याला अपवाद नव्हते. दहा वर्षापुर्वी या गावांत मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी बोकाळली होती. या भागातील शेतकऱ्यांना कोणतीच बँक कर्ज देत नव्हती. विविध सेवा सहकारी संस्थेचे कर्ज ठराविक शेतकऱ्यांनाच मिळायचे. अशावेळी सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सावकारांचाच आधार होता. पण स्वयंरोजगाराचे दालन खुले करून देणारा बचत गट अनेक गावांतील सर्वसामान्यांची आर्थिक नाडी बनला आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून नाममात्र शुल्क आकारून त्याला गटाचे सभासद करून घेतले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे ५० हजारापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बचत गट शेतकऱ्यांना अडीनडीला, रात्री-अपरात्री पैसे उपलब्ध करून देतो. त्यामुळेच शेतकऱ्यांना बँक व सावकारापेक्षा बचत गट अधिक फायदेशीर ठरत आहेत.