पंपचालकांच्या संपामुळे वाहनधारकांचे हाल
By Admin | Updated: August 12, 2014 02:02 IST2014-08-12T01:44:30+5:302014-08-12T02:02:04+5:30
औरंगाबाद : राज्यभर इंधनाचे दर एकसमान ठेवण्यासाठी एलबीटी व जकात हटविण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांनी सोमवारी पेट्रोलपंप बंद ठेवले.

पंपचालकांच्या संपामुळे वाहनधारकांचे हाल
औरंगाबाद : राज्यभर इंधनाचे दर एकसमान ठेवण्यासाठी एलबीटी व जकात हटविण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांनी सोमवारी पेट्रोलपंप बंद ठेवले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. आज शहरात कंपन्यांचे दोन आणि पोलिसांचा एक, असे तीनच पंप सुरू होते. तेथेही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनधारकांना लिटर, दोन लिटर पेट्रोलसाठी तासभर रांगेत उभे राहावे लागले. दरम्यान, रस्त्यात मध्येच पेट्रोल संपल्यामुळे अनेकांवर गाड्या ढकलत नेण्याची वेळ आली.
पेट्रोलपंप असोसिएशनने राज्यातील सर्व पेट्रोलपंप सोमवारी बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळपासून शहरातील तसेच ग्रामीण भागातील पेट्रोलपंपचालकांनी आपले पंप बंद ठेवले. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. पंपासमोर पेट्रोल नाही, अशा आशयाचे तर काही ठिकाणी आंदोलनाची माहिती देणारे डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे पंपावर जाणाऱ्यांना तसेच माघारी फिरावे लागत होते. तर काही जण पेट्रोलच्या शोधात धावाधाव करीत असताना दिसून आले.
पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी पेट्रोलपंप बंद ठेवले होते. मात्र, शहरातील पुंडलिकनगर रोडवरील इस्सार कंपनीचा आणि हर्सूल टी पॉइंट येथील एचपी कंपनीचा, तसेच टीव्ही सेंटर पोलिसांचा पेट्रोलपंप, असे तीन पेट्रोलपंप सुरू होते. शहरातील इतर सर्व पेट्रोलपंप बंद असल्यामुळे या तिन्ही पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टीव्ही सेंटर येथील पेट्रोलपंपांवरील रांगा अगदी रस्त्यावर आल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना पेट्रोल, डिझेलसाठी तासन्तास रांगेत थांबावे लागले.
रविवारी रात्रीच केले टँक फुल
सोमवारी पेट्रोलपंप बंद राहणार असल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने आधीच जाहीर केले होते. रविवारी रात्री व्हॉटस्अप आणि मोबाईलच्या माध्यमातून याची माहिती लोकांमध्ये आदान- प्रदान होत होती. त्यामुळे अनेकांनी रविवारी रात्री पेट्रोलपंपांवर जाऊन गाडीचे टँक फुल करून घेतले होते.