नियम धाब्यावर बसवून पाणी उपसा

By Admin | Updated: March 2, 2016 23:08 IST2016-03-02T23:03:24+5:302016-03-02T23:08:42+5:30

जालना : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गहिरे होण्याची भीती व्यक्त होत आहे. याच परिस्थितीत काही खाजगी पाणी विक्रेते नियम धाब्यावर बसवून दररोज हजारो लिटर पाण्याचा अवैध उपसा करीत असल्याचे

Due to the rules, water leaks | नियम धाब्यावर बसवून पाणी उपसा

नियम धाब्यावर बसवून पाणी उपसा


जालना : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गहिरे होण्याची भीती व्यक्त होत आहे. याच परिस्थितीत काही खाजगी पाणी विक्रेते नियम धाब्यावर बसवून दररोज हजारो लिटर पाण्याचा अवैध उपसा करीत असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.
शहरातील राजूर रिंंग रोड, नूतन वसाहत, भोकरदन रस्ता, औरंगाबाद रोड, मंठा चौफुली, मंमोदवी परिसरातील अनेक खाजगी पाणी विक्रेत्यांनी पाण्याची लूट चालविली आहे. भूगर्भातून दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी सुरू आहे. यामुळे आगामी काळात जालनेकरांना भयावह टंचाईचा सामना करावा लागत आहे. राजूर रिंग रोडवर एका खाजगी विक्रेत्यांकडून दिवसाकाठी पन्नास पेक्षा अधिक २० ते ३० हजार लिटरचे टँकर भरून दिले जाते. मंगळवारी दुपारी या ठिकाणी सात ते आठ पाण्याची वाहतूक करणारे मोठे टँकर उभे होते.
येथे तीन ते चार कूपनलिका असून, त्या पाचशेपेक्षा अधिक फूट खोल असल्याचे काहींनी सांगितले. येथून दररोज हजारो लिटर पाण्याचा रात्रंदिवस उपसा सुरू असतो. याच परिसरातील मुख्य रस्त्यावर पुलाच्या खाली काही विक्रेत्यांनी एका खड्ड्यात पाणी साठवून त्याची विक्री सुरू केली आहे. नदी पात्रात अवैध कूपनलिका घेऊन त्याठिकाणाहूनही पाणी उपसा होत आहे. वीज बंद झाल्यास जनरेटरचीही येथे व्यवस्था दिसून आली. शहरातील बहुतांश विक्रेत्यांकडे कोणताही पाणी विक्रीचा परवाना नाही. आपल्या सोयीनुसार अनेकजण पाणी विक्री करत असून, भूजलाची लूट करीत आहेत. लक्कडकोट, नूतन वसाहत, भोकरदन रोड भागातील अनेक ठिकाणी पाणी उपसा होत आहे.
पालिकेस अधिकार नाहीत
शहर परिसरातील शेकडो कूपनलिकांतून दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याचा उपसा होत आहे. आम्हाला कूपनलिका जप्त करण्याचा अथवा काही कारवाई करण्याचा अधिकार नाही. टंचाई काळात नगर पालिकेचे पाणी कमी पडत असेल त्यावेळी त्या आम्ही ताब्यात घेऊ शकतो. इतर वेळी कारवाईचा अधिकार नसल्याचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले.

Web Title: Due to the rules, water leaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.