बेसुमार वाळू उपशामुळे गोदाकाठची शेती धोक्यात
By Admin | Updated: December 8, 2015 00:03 IST2015-12-07T23:47:34+5:302015-12-08T00:03:33+5:30
वडीगोद्री : अंबड व घनसावंगी तालुक्याला गोदावरी नदी वरदान आहे. मात्र, गत काही वर्षांत नदीतील वाळूच्या बेसुमार उपशामुळे हे पात्र वाळवंट बनत आहे.

बेसुमार वाळू उपशामुळे गोदाकाठची शेती धोक्यात
वडीगोद्री : अंबड व घनसावंगी तालुक्याला गोदावरी नदी वरदान आहे. मात्र, गत काही वर्षांत नदीतील वाळूच्या बेसुमार उपशामुळे हे पात्र वाळवंट बनत आहे. परिणामी पाणी पातळीत कमालीची खालावत असल्याने शेतीही धोक्यात आली आहे. वाळू उपशाकडे महसूलसह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सुजलाम सुफलाम असलेले हे पात्र आज रोजी भकास झाले आहे. दहा ते पंधरा फुट खड्डे लक्ष वेधून घेतात. जेसीबी मशीन, पोकलँड मशीन आदी अत्याधुनिक साहित्याचा वापर करून वाळू तस्कारांनी गोदेचे पात्र अक्षरश: खरडून टाकले आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात विहिरीही कोरड्या पडत आहेत.
अत्यल्प पावसामुळे परिसरातील जलसाठ्यांनाही पाणी नाही. पिके जगवावीत कशी, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गत तीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे शेतीची माती होत आहे. अवैध वाळू उपसा करून तस्करांची चांदी होत आहे. काही ठिकाणी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसही संधीचे सोने करत आहे. तालुक्यातून ज्या गावातून नदी गेली आहे तेथून हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. रात्री शेकडे वाहने, जेसीबी, पोकलँड फिरत असतात. वाळू उपशामुळे गोदावरी नदीत पाणी झिरपण्याची क्षमताच कमी झाली असल्याचे शेतकरी सांगतात. ज्या शेतकऱ्यांनी पात्रात विहिरी घेतल्या आहेत त्यातूनही लाखो लीटर पाण्याचा उपसा सुरू आहे.