निवडणुकीवर पावसाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:55 IST2017-10-04T23:55:16+5:302017-10-04T23:55:16+5:30
ऐन निवडणूक कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने महापालिका निवडणुकीवर पावसाचे सावट असून मनपाने शासकीय तंत्रनिकेतन परिसरात वॉटरप्रूफ टेन्ट टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी सदर इमारत गळतीच्या दुरुस्तीबाबतचे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

निवडणुकीवर पावसाचे सावट
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: ऐन निवडणूक कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने महापालिका निवडणुकीवर पावसाचे सावट असून मनपाने शासकीय तंत्रनिकेतन परिसरात वॉटरप्रूफ टेन्ट टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी सदर इमारत गळतीच्या दुरुस्तीबाबतचे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
मराठवाडा,विदर्भ,मध्य महाराष्टÑात भारतीय हवामान खात्याने ५ ते १४ आॅक्टोबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यात शेजारील आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथेही पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिका निवडणूक विभाग चिंताक्रांत झाला आहे. ऐन निवडणुकीत पाऊस झाल्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आणखीच जास्त चिंता वाढली आहे.
याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले, सध्या ईव्हीएम मशीन या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये ठेवल्या आहेत. या इमारतीबाहेरील टेन्ट हा वॉटरप्रूफ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच इमारतीची गळती दुरुस्त करण्याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून २ लाख ७० हजार रुपयांचा निधीही देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिका निवडणूक विभागाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे.जुन्या नांदेडातील देगलूरनाका व हैदराबाग परिसरातील ४० शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून मतदान जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी प्रत्येकी चार शिक्षकांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके शाळेत जाऊन सर्व विद्यार्थ्यांना मतदान जागृतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यातून मतदानाबाबतची जागृती घराघरांपर्यंत होईल. तसेच भावी मतदारामार्फत मतदानवाढीचे प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासन अतिवृष्टीच्या इशाºयानंतर सज्ज झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. विजांचा कडकडाट होत असल्यास शेतकरी, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. ओढे, नदी, नाले भरुन वाहत असल्यास ते ओलांडण्याचे टाळावे. तसेच आपत्तीच्या काळात सिंचन भवन येथे दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२६३८७० या क्रमाकावर संपर्क साधावा.