हमीभावाच्या वादामुळे तुरीचा सौदा बारगळला
By Admin | Updated: February 3, 2017 00:41 IST2017-02-03T00:39:59+5:302017-02-03T00:41:42+5:30
लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करण्यात येऊ नये, असे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने आडते- खरेदीदारांना बजावल्याने गुरुवारी आडते- खरेदीदारांनी तुरीचा सौदाच पुकारला नाही़

हमीभावाच्या वादामुळे तुरीचा सौदा बारगळला
लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करण्यात येऊ नये, असे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने आडते- खरेदीदारांना बजावल्याने गुरुवारी आडते- खरेदीदारांनी तुरीचा सौदाच पुकारला नाही़ परिणामी, तूर घेऊन आलेल्या जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांची पंचाईतच झाली़
लातूरच्या उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतीमालास चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यासह सीमावर्ती भागातील शेतमाल येतो़ सध्या दररोज तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे़ गुरुवारीही जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी १० क्विं़पेक्षा जास्त तूर विक्रीसाठी आणली होती़ दरम्यान, सौद्यासाठी बाजार समितीचे अधिकारी, आडते आणि व्यापारी जमले असता बाजार समितीने हमीभावापेक्षा तुरीची खरेदी- विक्री करु नये, असे बजावले़ त्यामुळे आडते आणि खरेदीदारांनी शासनाच्या हमीभावाप्रमाणे तूर खरेदी करणे परवडत नसल्याचे सांगून तुरीचा सौदाच पुकारला नाही़ त्यामुळे तूर वगळता अन्य शेतमालाचा सौदा झाला़ दरम्यान, तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली़
दरम्यान, शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करावी़ तसेच आडते- खरेदीदारांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी- विक्री करु नये़ अन्यथा योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले़