पाऊस पडत नसल्याने रोपे सुकू लागली
By Admin | Updated: July 23, 2014 00:31 IST2014-07-22T23:56:51+5:302014-07-23T00:31:57+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानावर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी गेली आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके दुपार धरत आहेत.

पाऊस पडत नसल्याने रोपे सुकू लागली
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानावर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी गेली आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके दुपार धरत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, अगोदर गारपीट त्यानंतर दुबार पेरणी आणि आता पावसाचा ताण यामुळे हे वर्ष खडतर असल्याची चर्चा शेतकरीवर्गातून होत आहेत़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात आजतागायत २३ हजार ८४९ हेक्टर्सवर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ अद्यापि, ७ टक्के शेतकरी संभ्रमात असून, संथ गतीने पेरणी होत असल्याचे चित्र आहे़ परंतु, पंधरा दिवसांपूर्वीच्या अल्प पर्जन्यावर पेरणी उरकली गेली. पावसाने आठ दिवसांपासून दडी मारल्याने कोवळी पिके दुपार धरत आहेत़ उन्हाचा तडाखा त्यांना सहन होत नाही. मागील काही दिवसांपासून जोरदार वारे सुटल्याने जमिनीतील ओलावा दिवसेंदिवस घटत आहे़ मध्येच काळेभोर ढग येतात. आता क्षणात जोरदार पर्जन्यमान होईल, असे वाटते़ परंतु, पाऊस काही येत नाही़ आजतागायत तालुक्यात केवळ २१५ मि़मी़ सरासरी पाऊस झाला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन साल खडतर असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे़(वार्ताहर)
दिवसा ढग रात्री चांदणे़़़
दिवसभर काळे ढग आणि रात्री टिपूर चांदणे असेच चित्र गेली आठ दिवसापासून दिसत आहे़ त्यामुळे काही शेतकरी तुषार संचाद्वारे पाणी देऊन दुपार धरणारी कोवळी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़
शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या जीवनवाहिन्या असलेल्या घरणी, मांजरा या नद्यांची पात्रे कोरडीठाक असून, अद्यापि, एक वेळाही या नद्यांना पूर आला नाही़ त्यामुळे जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़