वैद्यकीय उपचार व जागरूक पालकांमुळे ‘ती’चा झाला ‘तो’
By Admin | Updated: December 28, 2015 23:47 IST2015-12-28T23:32:53+5:302015-12-28T23:47:16+5:30
औरंगाबाद : लहानपणापासून मुलगी म्हणून वाढविले, मुलीचे कपडे घातले, नावही मुलीचे; परंतु त्यांना मुलीप्रमाणे न राहता मुलांसारखे राहण्याची,

वैद्यकीय उपचार व जागरूक पालकांमुळे ‘ती’चा झाला ‘तो’
औरंगाबाद : लहानपणापासून मुलगी म्हणून वाढविले, मुलीचे कपडे घातले, नावही मुलीचे; परंतु त्यांना मुलीप्रमाणे न राहता मुलांसारखे राहण्याची, त्यांच्याप्रमाणे कपडे घालण्याची अन् क्रिकेट खेळण्याची ओढ. आपल्या चिमुकल्यांची होणारी घुसमट, भावना आणि शारीरिक अवस्था वेळीच ओळखून जागरूक पालकांनी त्यांना नवीन आयुष्य दिले. आज अनेक ‘ती’चा ‘तो’ तर अनेक ‘तो’चा ‘ती’ झाले असून, सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहेत.
पेडियाट्रिक सर्जन डॉ. संदीप हंबर्डे यांनी तसेच काही चिमुकल्यांनी आणि त्यांच्या पालकांनी यासंदर्भात सोमवारी पत्रकार परिषदेत संवाद साधला. इंटरसेक्स डिसआॅर्डर किंवा डिसआॅर्डर आॅफ सेक्स्युअल डिफरेंटशन या व्यंगामध्ये जन्म घेतलेल्या चिमुकल्यांच्या बाबतीत मुलगा की, मुलगी असा लिंगसंभ्रम निर्माण होतो. प्रकारात शारीरिक व्यंग, वेगळ्या भावना, हालचाली जाणवत असल्याने मुलगा म्हणावे की मुलगी, असा पेच पालकांना पडतो, समाजाचा विचार करून अथवा भीतिपोटी हा आजही वैद्यकीय क्षेत्रातील दुर्लक्षित भाग आहे. कित्येक रुग्ण याबाबत डॉक्टरांकडून सल्ला घेतात; परंतु प्रत्यक्षात उपचार घेत नाहीत. हा आजार जन्मजात व्यंग असून, त्याची योग्य पद्धतीने माहिती व उपचार घेतल्यास सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगता येते. त्यासाठी वैद्यकीय उपचाराबरोबर कौटुंबिक आणि सामाजिक मदतीचा हात मिळण्याची गरज आहे. आपल्या मुलांच्या बाबतीत अशा प्रकारची समस्या वेळीच ओळखून अनेक पालकांनी त्यांना वेळीच सावरले आहे.
२० जणांवर शस्त्रक्रिया
गेल्या तीन वर्षांत शहरात २० चिमुकल्यांवर अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत. शस्त्रक्रियेपूर्वी अनेकांनी मुलांना १२ वर्षांपर्यंत मुलगी म्हणून वाढविले; परंतु वेळीच परिस्थिती लक्षात आल्याने ही मुले आज इतर मुलांसारखे जीवन जगू लागले आहेत. सुरुवातीपासून मुलगी अथवा मुलगा म्हणून वाढविल्यानंतर हजेरीपटापासून सर्व कागदपत्रांवर त्याचप्रमाणे नाव नोंदवलेले असते. शस्त्रक्रियेनंतर नावात बदल करण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. हा त्रास कमी होण्याची गरज आहे.