अधिष्ठातांमुळेच पदव्युत्तर प्रवेशाचे वाजले तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:04 IST2017-08-24T01:04:44+5:302017-08-24T01:04:44+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे अधिष्ठातांमुळे तीनतेरा वाजले असल्याचा खळबळजनक आरोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला

अधिष्ठातांमुळेच पदव्युत्तर प्रवेशाचे वाजले तीनतेरा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे अधिष्ठातांमुळे तीनतेरा वाजले असल्याचा खळबळजनक आरोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. विद्यापीठातील टॉपच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रांसह ९० टक्के विभागात अत्यल्प प्रवेश झाले आहेत. महाविद्यालयांची अवस्था तर त्याहून वाईट बनली असल्यामुळे संतापलेल्या कुलगुरूंनी विविध विभागांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा प्रवेशाची विदारक अवस्था समोर आली.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचा गुंता अधिकच वाढला आहे. ढिसाळ नियोजन आणि प्रत्येक दिवशी नवीन नियम काढल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठातील एकूण विभागांमध्ये शेवटच्या दिवशी प्रवेशाच्या ५० टक्केही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. मागच्या वर्षी रसायनशास्त्र विभागातील ७० जागांसाठी ११०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. मात्र यावर्षी विद्यापीठाने लावलेल्या यादीतील केवळ ४२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. हीच अवस्था भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, सांख्यिकीयशास्त्राची बनली आहे. सामाजिक शास्त्रातील काही विभागांमध्ये तर दोन आकडीही प्रवेश झाले नसल्याचे पाहणीत समोर आले. या गोंधळमुळे कुलगुरूंनी थेट रसायनशास्त्र, संगणशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकीय, पर्यावरण आदी विभागांना भेटी दिल्या. या पाहणीत मोठा सावळा गोंधळ समोर आला. रसायनशास्त्र विभागात ७० जागा असताना केवळ ६० विद्यार्थ्यांची यादी पाठविली. मात्र स. भु. विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे ६० जागा असताना ७५ विद्यार्थ्यांची यादी पाठविली, असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. स्पॉट अॅडमिशनसाठी ठेवलेल्या अर्जातही मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्यावर अनेक प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता सर्व प्रक्रिया एसी हॉलमध्ये बसून अधिष्ठातांनी राबविली. या अधिष्ठातांच्या मनमानीमुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. या अधिष्ठातांवर कारवाई करण्याची मागणीही अनेकांनी कुलगुरूंकडे केली. त्यावर कुलगुरूंनीही अधिष्ठातांच्या हलगर्जी आणि वास्तववादी भूमिकेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याचे मान्य केले. प्रवेश प्रक्रिया पार पाडताच सर्व अधिष्ठातांची उचलबांगडी करण्याचे सूतोवाचही कुलगुरूंनी केले.
शेवटपर्यंतही गुणवत्ता यादी नाहीच
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दोन फेºयाची प्रवेश प्रक्रिया संपली. तरीही विद्यापीठ प्रशासनाने गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. या गुणवत्ता यादीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे केल्या आहेत. अनेकांना सीईटीमध्ये चांगले मार्क मिळालेले असताना त्यांच्यापेक्षा कमी मार्क पडलेल्या विद्यापीठातील विभागात प्रवेश मिळाले. यात विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांना दोन्ही फेºयांमध्ये प्रवेश मिळालेला नाही.