चार दिवसांपासून विवाहितेचा मृतदेह घाटीच्या शवागृहातच
By Admin | Updated: May 18, 2014 01:23 IST2014-05-18T01:06:02+5:302014-05-18T01:23:12+5:30
औरंगाबाद : रागाच्या भरात पतीच्या हातून मरण पावलेल्या विवाहितेचा मृतदेह नातेवाईकांच्या प्रतीक्षेत तब्बल चार दिवसांपासून घाटी हॉस्पिटलच्या शवागृहात पडून आहे.

चार दिवसांपासून विवाहितेचा मृतदेह घाटीच्या शवागृहातच
औरंगाबाद : रागाच्या भरात पतीच्या हातून मरण पावलेल्या विवाहितेचा मृतदेह नातेवाईकांच्या प्रतीक्षेत तब्बल चार दिवसांपासून घाटी हॉस्पिटलच्या शवागृहात पडून आहे. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ सुरेश भटांची ही कविता एका संघर्षमय जीवनाची व्यथा सांगते. मात्र, येथे एका विवाहितेच्या वाट्याला आलेला संघर्ष मेल्यानंतरही थांबायचे नाव घेत नाही. छत्तीसगढ येथील युगुलाने मुंबई येथे पळून जाऊन तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. ही घटना त्या तरुणीच्या कुटुंबियांना रुचली नाही. तरुणी घरातून निघून गेल्यापासून आजपर्यंत तिच्या नातेवाईकांनी तिची कधी विचारपूसही केली नाही. गवंडी काम करणारा जितेंद्र निर्मल (२८, रा. छत्तीसगढ) याचे गावातील सावित्री या तरुणीसोबत प्रेम जुळले. दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. दोन्ही कुटुंबांचा यांच्या प्रेमाला होत असलेला तीव्र विरोध पाहून ते मुंबईला पळून गेले. तेथे त्यांच्या संसाराची वेल बहरली. त्यांना एक गोंडस मुलगी झाली. मुंबईसारख्या महानगरात संसार थाटणे त्या युगुलासाठी अशक्यप्राय बाब वाटल्यामुळे ते औरंगाबादला आले. काद्राबाद येथे किरायाच्या खोलीत ते राहू लागले. १४ मे रोजी रात्रीच्या वेळी जितेंद्र घरात असताना सावित्रीने तिच्या १८ महिन्यांच्या मुलीला झोडपले. या घटनेचा जितेंद्रला राग आला. त्याने पत्नी सावित्रीला शिवीगाळ करीत मारहाण केली. तिनेही त्याला प्रत्युत्तर दिले. त्याने तिचा गळा दाबला. थोड्या वेळानंतर ते दोघेही झोपी गेले; पण १८ महिने वयाची ती निरागस बालिका दूध पिण्यासाठी रडू लागली. आईला उठविण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता; पण तिच्या आईने केव्हाच या जगाचा निरोप घेतलेला होता. मुलगी मोठमोठ्याने रडू लागल्यामुळे जितेंद्रच्या शेजारी राहणार्या छत्तीसगढ येथील कुटुंबातील एक महिलेने त्यांचे दार ठोठावले. जितेंद्रने दरवाजा उघडला. त्या महिलेने बालिकेला घरी नेऊन दूध पाजले व परत आणून घरात दिले. त्यावेळी तिने सावित्रीला उठविण्याचा बराच वेळ प्रयत्न केला; पण ती निपचित पडलेली होती. तिने घरी जाऊन आपल्या पतीला ही बाब सांगितली. त्यानेही सावित्रीला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध असल्याचे निदर्शनास येताच त्याने व जितेंद्रने तिला घाटी हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून सावित्रीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. तेथून पुढे मग चिकलठाणा पोलिसांनी जितेंद्र यास अटक करून गुन्हा दाखल केला. सावित्रीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. परंतु तिच्या पार्थिवावर अद्यापही अंत्यसंस्कार झालेले नाहीत. पोलिसांना तिच्या नातेवाईकांची प्रतीक्षा आहे. पोलीस आणखी चार दिवस सावित्रीच्या नातेवाईकांची वाट बघणार आहेत. त्यापुढे पोलीस स्वत:च मृतदेहावर अंत्यसंस्कार करतील, अशी माहिती सहायक निरीक्षक प्रिया थोरात यांनी सांगितली. त्यानंतर त्या बालिकेला जिल्हा बालकल्याण समितीच्या आदेशानुसार एखाद्या बालसंगोपन केंद्रात सोडले जाईल. १८ महिन्यांची बालिका बेवारस सावित्रीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे प्रेत शवागृहात ठेवण्यात आले. पती जितेंद्र हा चिकलठाणा पोलिसांच्या लॉकअपमध्ये. त्याची १८ महिन्यांची निरागस बालिका सध्या बेवारस झाली आहे. तिला तूर्तास छत्तीसगढ येथील रहिवासी असलेल्या शेजारच्या कुटुंबाकडे ठेवण्यात आले आहे.