मामाच्या भूमिकेमुळे डॉक्टर संभ्रमात
By Admin | Updated: June 9, 2014 01:11 IST2014-06-09T00:42:15+5:302014-06-09T01:11:00+5:30
सतीश जोशी , परभणी आगामी विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्यात लागणार असल्या तरी आतापासूनच इच्छुकांना वेध लागले आहेत़

मामाच्या भूमिकेमुळे डॉक्टर संभ्रमात
सतीश जोशी , परभणी
आगामी विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्यात लागणार असल्या तरी आतापासूनच इच्छुकांना वेध लागले आहेत़ सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार अंदाज घेत असून, त्या दृष्टीने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हालचाली पहावयास मिळत आहेत़ या निवडणुकीत विद्यमान आ़ सीताराम घनदाट यांचा पक्ष कोणता असेल याचा अंदाज येत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ़ मधुसूदन केंद्रे संभ्रमात आहेत़
परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड असे चार विधानसभा मतदारसंघ़ परभणी आणि पाथरीत शिवसेनेची तर जिंतूरमध्ये काँग्रेस तर गंगाखेडमध्ये अपक्ष उमेदवाराने मागच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती़ जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेडकडे बघितले जाते़ मागच्या निवडणुकीत अनेक जण रिंगणात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, भाजपाचे डॉ़ मधुसूदन केंद्रे आणि अपक्ष आ़ सीताराम घनदाट यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती़
विशेष म्हणजे अनेक वर्षांच्या आरक्षणानंतर २००९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सुटला असतानाही कुठल्याही जाती-पातीचे, धर्माचे, पक्षाचे राजकारण न चालता मतदारांनी ऐतिहासिक निकाल दिला होता़ घनदाट यांनी वरपूडकर आणि डॉ़ केंद्रे यांचा दणदणीत पराभव करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला़ यावेळी परिस्थिती बदलली़ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी शिवसेनेला जवळपास ५४ हजारांची निर्णायक आघाडी मिळाली होती़ त्यामुळे भाजपाकडून निवडणूक लढविण्यास गणेशराव रोकडे, विठ्ठलराव रबदडे, रामप्रभू मुंडे हे इच्छुक आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मध्यंतरी गंगाखेड शुगर्सचे रत्नाकर गुट्टे यांचे नाव चर्चिले जात होते़ परंतु, लोकसभा निवडणुकीत ते कुठेही नजरेस न पडल्याने त्यांचा पक्ष कोणता, असाही प्रश्न आहे़ तसेच माजी खा.सुरेश जाधव हे देखील राकाँकडून इच्छुक आहेत. गंगाखेड मतदारसंघामध्ये गंगाखेडसह पूर्णा आणि पालम तालुक्यांचा समावेश होतो़ याशिवाय या मतदारसंघात मराठा मताप्रमाणेच वंजारी, हटकर, धनगर या ओबीसी मतदारांचेही प्राबल्य आहे़ या मतदार संघावर भाजपाचे गोपीनाथ मुंडे यांचे प्रभुत्व होते़ परंतु, त्यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे़ एकंदरीत काय तर या मतदारसंघात आजही तिरंगी लढतीची अपेक्षा आहे़ महायुतीचा उमेदवार कोण,यानंतरच निकालाविषयी अंदाज बांधता येतील़
आ़ सीताराम घनदाट यांचीच भूमिका काय असेल हे स्पष्ट होत नाही़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ़ घनदाट यांनी माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, जिंतूरचे काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर, राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांच्या हातात हात घालत महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव यांचा उघडउघड प्रचार केला होता़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार असतील की पूर्वीप्रमाणेच अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, याचा अंदाज आजतरी येत नाही़
गतवेळेचे भाजपाचे डॉ़ मधुसूदन केंद्रे हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असतील़ सुरेश वरपूडकर हे पाथरीमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी निश्चितच त्यांचे सहकार्य डॉ़ मधुसूदन केंद्रे यांच्या पाठीशी असेल़