चाऱ्याअभावी दूध घटले
By Admin | Updated: August 21, 2015 00:42 IST2015-08-21T00:37:49+5:302015-08-21T00:42:39+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात दूध उत्पादनात घट जाणवत असे. यंदा मात्र सलग चार महिन्यांपासून दूध उत्पादनात घट झाल्याचे समोर आले आहे

चाऱ्याअभावी दूध घटले
बाळासाहेब जाधव , लातूर
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात दूध उत्पादनात घट जाणवत असे. यंदा मात्र सलग चार महिन्यांपासून दूध उत्पादनात घट झाल्याचे समोर आले आहे. दिवसाला ४ लाख १५ हजार ७२५ लिटर्सचे दूध संकलन जिल्ह्यात होते. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून यात घट झाली असून, आता पावणेचार लाख लिटर्सवर संकलन आले आहे.
लातूर जिल्ह्यात ५ लाख १५० पशुधनाची संख्या आहे. त्यापैकी ३ लाख ६१ हजार ३२५ दुधाळ जनावरांची संख्या असून, यात गायी, म्हशींसह शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. या जनावरांना दिवसाकाठी ३ हजार १६६ किलो चारा लागतो. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून हिरवा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. जवळपास दिवसाला १५ हजार लिटर्सने दूध कमी झाले आहे. लातूर जिल्ह्यात २ लाख ३२ हजार ५८४ दुधाळ गायी, म्हशी आहेत. यामध्ये जिल्हा दूध संघाकडून ७ हजार लिटर्स, सहकारी संस्थेकडून ३ हजार लिटर्स, खाजगी संकलन केंद्राकडून १८ हजार लिटर्स व बाहेरून विक्रीसाठी येणारे ८० हजार लिटर्स दूध लातूर जिल्ह्यासाठी येते. आहे त्या दूध उत्पादनावर लातूर जिल्ह्यातील नागरिकांची गरज भागत नाही. त्यामुळे शासकीय दूध संकलन वगळता खाजगी दूध विक्रेत्यांनी दुधाचे भाव वाढविले आहेत. दुग्धोत्पादनात घट झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या २४ लाख ५४ हजार १३६ इतकी आहे. प्रती व्यक्ती अडीचशे एमएल. दुधाची गरज आहे. या सूत्राप्रमाणे प्रस्तुत लोकसंख्येचा विचार करता संकलन होणारे दूध कमी आहे. आणखी ४० हजार लिटर्स दूध दिवसाला मिळाले, तर प्रती व्यक्ती अडीचशे एमएल. दूध मिळेल. परंतु, उत्पादन घटले आहे. त्यामुळे ४० हजार लिटर्स दुधाची गरज भागविणे अशक्य झाले आहे.
लातूर जिल्ह्यात सहकारी संस्था, शासकीय दूध संकलन केंद्र आणि खाजगी व्यक्तींकडून संकलन झालेले दूध ४ लाख १५ हजार ७२५ लिटर्स आहे. परंतु, त्यात दिवसेंदिवस घटच होत आहे. केवळ चारा नसल्यामुळे घट झाली असल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एस.जे. सावळकर यांनी दिली. दुधाळ जनावरांची संख्या असली तरी या जनावरांचे दूध आटत आहे. त्यामुळे दुधात घट झाली असल्याचे सहायक पशुसंवर्धन आयुक्त एस.एच. शिंदे यांनी सांगितले.
वरवे झाले बंद...
४ग्रामीण भागातून शहरी भागात दूध विक्रीसाठी येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या लातूर शहरात लक्षणीय आहे. चांगल्या दर्जाचे दूध ५० ते ७० रुपये लिटर आहे. शिवाय, त्यात पाणी नसेल याची खात्री नाही. त्यातच दुधाचे भाव वधारल्यामुळे शहरात अनेकांनी वरवे बंद केले आहेत. केवळ दूध घटल्यामुळे भाव वाढले असून, अनेकांनी वरवेही बंद केले आहेत.
दुधाळ जनावरांची संख्या असली, तरी सकस आणि हिरवा चारा नसल्यामुळे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. गतवर्षीच्या आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदा दूध जवळपास १५ हजार लिटर्सनी घटले आहे. वास्तविक दरवर्षी आॅगस्ट महिन्यात दुधात वाढ होते. परंतु, यंदा चारा नसल्यामुळे घट झाली असल्याचे पशुसंवर्धन विभाग तसेच दूध संकलन केंद्रांकडून सांगण्यात आले आहे.