मुख्याधिकाऱ्याअभावी पालिकेचा कारभार विस्कळीत

By Admin | Updated: August 28, 2014 01:39 IST2014-08-28T01:33:18+5:302014-08-28T01:39:39+5:30

नळदुर्ग : येथील नगर परिषदेला गेल्या पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. शहरात नियमितपणे साफसफाई होत नसून,

Due to lack of Chief Officer, the control of the corporation is disrupted | मुख्याधिकाऱ्याअभावी पालिकेचा कारभार विस्कळीत

मुख्याधिकाऱ्याअभावी पालिकेचा कारभार विस्कळीत


नळदुर्ग : येथील नगर परिषदेला गेल्या पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. शहरात नियमितपणे साफसफाई होत नसून, यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
येथील पालिकेत त्रिंबक ढेंगळे-पाटील हे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. १ एप्रिल २०१४ रोजी त्यांची बदली झाली. तेव्हापासून आजतागायत हे पद रिक्त आहे. प्रारंभी तुळजापूरचे नायब तहसीलदार जाधव यांच्याकडे येथील मुख्याधिकाऱ्यांच्या अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यानंतर आता हा पदभार तुळजापूर पालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबने यांच्याकडे आहे. परंतु, त्यांना तुळजापुरातील कामे पाहून इकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सध्या पालिकेतील अनेक कामांचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे.
मुख्याधिकारीच नसल्याने कर्मचाऱ्यांवरही कुणाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी वाट पहावी लागत आहे. शिवाय शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामेही विस्कळीत झाली आहेत. शहरातील बौध्द नगर, रहीम नगर, वडार वाडी, इंदिरा नगर, व्यास नगर, रामलिला नगर, वसंत नगर भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तसेच साफसफाई कर्मचारी नियमित येत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. शहरात अनधिकृत नळधारकांचीही संख्या वाढली असून, कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पालिकेत साफसफाई कर्मचाऱ्यांसह ५४ कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, मुख्याधिकारीच नसल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक नसल्याचे दिसते. शहराच्या अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट जनावरांचा उपद्रवही वाढला असून, शहरवासियांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करून पालिकेचा विस्कळीत झालेला कारभार सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दरम्यान, याबाबत उपनगराध्यक्षा सुप्रिया पुराणिक यांच्याशी संपर्क साधला असता कायम मुख्याधिकारी नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच याबाबत सभागृहातही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Due to lack of Chief Officer, the control of the corporation is disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.