इंटरनेटच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालयाकडे हेलपाटे
By Admin | Updated: July 24, 2014 00:10 IST2014-07-23T23:41:10+5:302014-07-24T00:10:31+5:30
जळकोट : येथील तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे़

इंटरनेटच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालयाकडे हेलपाटे
जळकोट : येथील तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे़ परंतु, इंटरनेट वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून खेटे मारावे लागत आहेत़
जळकोट येथील तहसील कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी, नागरिक उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे तोबा गर्दी करत आहेत़ ही प्रमाणेपत्रे काढण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे़
त्यामुळे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी दिसून येत आहे़ तहसीलच्या सेतूतून ही प्रमाणपत्रे वेळेत मिळणे अपेक्षित असताना सेतूतील इंटरनेट वारंवार बंद पडत आहे़ त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांना गेल्या तीन- चार दिवसांपासून चकरा माराव्या लागत आहे़
त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे़ त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होत आहे़ इंटरनेट बंदचा फटका बँकांनाही बसत असल्याचे सांगण्यात आले़(वार्ताहर)
काही ठिकाणची वायरींग खराब झाल्यामुळे त्याची दुरूस्ती चालू आहे़ परिणामी, इंटरनेटवर परिणाम होत असल्याचे लातूरच्या दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले़