तलवारी उपसण्याचे प्रकार वाढल्याने दहशत

By Admin | Updated: December 20, 2015 23:35 IST2015-12-20T23:26:49+5:302015-12-20T23:35:02+5:30

वसमत : शहरामध्ये लहानसहान कारणावरून झालेल्या वादात चक्क तलवारी काढण्यापर्यंत मजल जात आहे.

Due to the increase in the types of sword pumping, panic | तलवारी उपसण्याचे प्रकार वाढल्याने दहशत

तलवारी उपसण्याचे प्रकार वाढल्याने दहशत

वसमत : शहरामध्ये लहानसहान कारणावरून झालेल्या वादात चक्क तलवारी काढण्यापर्यंत मजल जात आहे. पोलिसांचा धाक व कायद्याची भीती वाटत नसणाऱ्या सटरफटर गुंडांमुळे वसमतमधील शांतता बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वसमत शहरातील मुख्य चौक असलेल्या झेंडा चौकाजवळ चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. भरबाजारात झालेल्या हाणामारीत चक्क तलवारी काढण्याचा प्रकार झाला. तलवारीच्या हल्ल्यात एकजण जखमीही झाला आहे. या प्रकरणात चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र यातील एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. यापूर्वीही शहरात तलवारी घेऊन हाणामाऱ्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. गुंडांचे टोळके दुचाकीवरून तलवारी घेवून एकमेकांचा पाठलाग करतानाचे चित्र अनेकदा पहावयास मिळते. मात्र गुन्हे दाखल होत नसल्याने किंवा परस्पर प्रकरण मिटविण्यात येत असल्याने पोलिस दफ्तरात असे प्रकार नोंदवले जात नाहीत. परिणामी गुंड टोळक्यांची हिंमत वाढत चालली आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्याने सामान्य नागरिकांत मात्र भीतीचे वातावरण आहे. अशा घटनांतील गुन्हे दाखल झाल्यानंतरही तलवारी जप्त होण्याची कारवाई मात्र झाल्याचे समोर येत नाही. अशा प्रकारांतूनच संबंधितांची घातक हत्यारे बाळगण्याची हिंमत वाढत चालली आहे. अनेकदा तर मिरवणुकांमध्येही तलवारबाजीचे खेळ दाखवले जात आहेत. पोलिस बंदोबस्तात निघालेल्या मिरवणुकीत अनेकदा तलवारधारी तरूण जल्लोष करताना पहावयास मिळतात, हे विशेष. ज्या झेंडाचौकात तलवारीने हाणामारीची घटना घडली त्या चौकाशेजारील गल्लीत कायम मटकाचालक व दारूड्यांची गर्दी राहते. भररस्त्यावर उभे राहून दारू पिण्याचे प्रकारही या गल्लीत होत असतात. मात्र बीट जमादार किंवा अधिकारी कधी या भागात फिरकत नाहीत.
झेंडा चौकाजवळच दिवसभर मोबाईल मटकाचालक धंदा घेत फिरत राहतो. त्याच्यामागे मटका शौकीनही शेजारच्या गल्लीत बसून आकडे काढत व आकडा येण्याची वाट पाहतात. हे प्रकार खुलेआम सुरू असले तरी एकदाही गणवेशात बीट जमादार फिरकलेले पहावयास मिळत नाहीत. यातूनच मग गंभीर प्रकार घडत असल्याचे चित्र आहे.
(वार्ताहर)

Web Title: Due to the increase in the types of sword pumping, panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.