औरंगाबाद : दहावी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सायंकाळी समोर आले. ही घटना पुंडलिकनगर परिसरातील न्यू हनुमाननगर येथे ८ जून रोजी दुपारी घडली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.अनिकेत संजय शेळके (१६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, अनिकेत हा गजानन कॉलनी येथील ज्ञानप्रकाश विद्यामंदिरचा विद्यार्थी होता. शुक्रवारी दुपारी दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. दुपारी एक वाजेनंतर मोबाईलवरून अनिकेतने त्याचा निकाल पाहिला. तेव्हा त्याला बोर्ड परीक्षेत अपयश आल्याचे समजले. या निकालामुळे त्याला प्रचंड नैराश्य आले. मात्र ही बाब त्याने कुणालाही सांगितली नाही. नंतर तो त्याच्या खोलीत गेला आणि त्याने छताच्या हुकाला स्कार्पने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. दुपारी साडेचार वाजले तरी अनिकेत खोलीतून बाहेर आला नसल्यामुळे नातेवाईकांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा अनिकेतने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. यानंतर बेशुद्धावस्थेत अनिकेतला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे हनुमाननगर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.------------
नापास झाल्याने दहावीतील विद्यार्थ्याने कवटाळले मृत्यूला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:15 IST