छाप्यामुळे ठोंबरे होते ‘निशाण्या’वर !
By Admin | Updated: March 1, 2016 00:46 IST2016-03-01T00:10:22+5:302016-03-01T00:46:34+5:30
बीड : पोलीस हल्ला प्रकरणामागे वेगवेगळे कांगोरे दडल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. मुख्य आरोपी राष्ट्रवादीचा नगरसेवक शेख मुस्तफा याच्या पत्त्याच्या क्लबवर

छाप्यामुळे ठोंबरे होते ‘निशाण्या’वर !
बीड : पोलीस हल्ला प्रकरणामागे वेगवेगळे कांगोरे दडल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. मुख्य आरोपी राष्ट्रवादीचा नगरसेवक शेख मुस्तफा याच्या पत्त्याच्या क्लबवर दोन वर्षांपूर्वी दरोडा प्रतिबंधक पथकाने छापा टाकला होता. तेंव्हापासून कैलास ठोंबरे हे मुस्तफाच्या निशाण्यावर होते. दरम्यान, जखमी ठोंबरे यांचा डावा डोळा निकामी झाल्याने ते अधू झाले आहेत.
ग्रामीण ठाण्यात कार्यरत पोकॉ कैलास ठोंबरे यांच्यावर शनिवारी रात्री अहमदनगर रोडवरील सिंहगड हॉटेलमध्ये हल्ला झाला होता. त्यांच्या डोक्यात दारुची बाटली फोडून काचेचा तुकड्याने डोळ्यावर वार केला होता. गंभीर जखमी झाल्याने ठोंबरेंना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन जालना येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे त्यांच्या डाव्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न झाला;परंतु बुबुळाला मार लागल्याने त्यांची दृष्टी अधू झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी रविवारी राकॉ नगरसेवक शेख मुस्तफा, गणेश जाधव व इतर सात जाणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकाही आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नाही.
नगरसेवक मुस्तफा हा गेल्या काही वर्षांपासून अवैध धंद्यांत होता. दरोडा प्रतिबंधक पथकाने केलेल्या कारवाईनंतर तो ठोंबरे यांच्यावर डूख धरुन होता. शनिवारी जुन्या रागातूनच त्याने ठोंबरेंवर अमानुष हल्ला चढविला.
तथापि, तत्कालीन प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक हिमंतराव जाधव यांनी २०१२ मध्ये पालवण चौकातील त्याचा जुगारअड्डा उद्ध्वस्त करण्याची ‘हिमंत’ दाखवली होती. त्याच्यावर अवैध धंद्याचे चार ते पाच गुन्हे नोंद असल्याचेही उघड झाले आहे. (प्रतिनिधी)