पुरामुळे २६ गावांचा तुटला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:07 IST2017-08-21T00:07:20+5:302017-08-21T00:07:20+5:30
शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़

पुरामुळे २६ गावांचा तुटला संपर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़ रविवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती़ दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर दाखल झालेल्या पावसामुळे शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे.
परभणी जिल्ह्यात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली आहे़ ३८ मंडळांपैकी ४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता़ या पावसामुळे यावर्षी प्रथमच ओढे, नाले खळाळून वाहिले़ परभणी तालुक्यातील इंद्रायणी नदीला पूर आला तर पिंगळगड नाल्याला आलेल्या पुरामुळे विद्यापीठातून जाणारा रस्ता बंद झाला होता़ परिणामी बलसा, सायाळा, शेंद्रा, रायपूर, लोहगाव या गावांचा संपर्क तुटला होता़ धामोडी ओढ्याला पूर आल्याने या परिसरातील नांदखेडा, करडगाव, सनपुरी, धारणगाव, हिंगला, वाडी दमई, साटला, सुलतानपूर या गावांचा संपर्क तुटला होता़
पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी या सहा गावांचा संपर्क तुटला होता़ त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील कोल्हा-कोथाळा रस्त्यावरील धरमोडा ओढ्याला पूर आल्याने कोथाळा, सोमठाणा, आटोळा, राजुरा, नरळद, टाकळी नीलवर्ण, शेवडी या सात गावांना जाणाºया रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. सेलू तालुक्यामध्ये कसुरी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता़ तसेच वालूर गावाकडे जाणाºया रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़