मोसंबी बागांवर यंदाही दुष्काळाची कुऱ्हाड
By Admin | Updated: December 4, 2014 00:52 IST2014-12-04T00:33:27+5:302014-12-04T00:52:41+5:30
जालना : प्रति एकरी उताऱ्यातील मोठी घट, करार केलेल्या व्यापाऱ्यांच्या घुमजावासह पुन्हा बागा विक्रीचा व सहा महिन्यांपर्यंत बागा जगविण्याच्या यक्ष प्रश्नाने

मोसंबी बागांवर यंदाही दुष्काळाची कुऱ्हाड
जालना : प्रति एकरी उताऱ्यातील मोठी घट, करार केलेल्या व्यापाऱ्यांच्या घुमजावासह पुन्हा बागा विक्रीचा व सहा महिन्यांपर्यंत बागा जगविण्याच्या यक्ष प्रश्नाने या जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक अक्षरश: चक्रावून गेले आहेत.
गेल्यावर्षी मोसंबीस बऱ्यापैकी भाव होता. यावर्षी सुद्धा तोच भाव कायम राहील, अशी आशा मोसंबी उत्पादक बाळगून होते. त्यामुळेच सप्टेंबरच्या प्रारंभीच या उत्पादकांना नव्या उमेदीने व्यापाऱ्यांबरोबर करार केले. इसार घेतला. विशेष म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत बऱ्यापैकी भाव होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो कमी असेल परंतु जो भाव आहे तो बरा म्हणून मोसंबी उत्पादकांनी भराभर करार केले. परंतु गेल्या महिना सव्वा महिन्यांपासून भाव कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर मोसंबी उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उताऱ्यापाठोपाठ भाव घटल्याने, व्यापारी बागा सोडून पळू लागल्याने मोसंबी उत्पादकांसमोर अनेक यक्ष प्रश्न उभे राहिले आहेत.
गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या बागायतदारांची मानसिक व आर्थिक अवस्था पूर्णत: कोलमडली आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी नुकसानीपोटी सरकारने या बागायतदारांना प्रती हेक्टरी साह्य अनुदान देऊन दिलासा द्यावयाचा प्रयत्न केला होता. परंतु यावर्षी फळबाग धारकांसमोर संकटांची मालिका उभी असताना सुद्धा नव्या सरकारने अद्यापही कोणताही निर्णय न घेतल्याने फळ उत्पादक हतबल झाले आहेत.
नुकसानीपोटी प्रती हेक्टरी किमान साह्य अनुदान उपलब्ध करावे, अशी रास्त अपेक्षा फळबाग उत्पादकांतून व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सप्टेंबर ते डिसेंबर हा मोसंबीचा अंबेबहार गेल्यावर्षी सर्वसाधारणपणे प्रति हेक्टरी वीस ते पंचवीस टन असा उतारा होता. यावर्षी पावसाअभावी त्या उताऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. सर्वसाधारणपणे एकेरी आठ ते दहा टन एवढा उतारा आहे. पाण्याअभावीच उताऱ्यात मोठी घट झाली. हे स्पष्ट आहे.
४गेल्यावषी प्रति टनास २० ते २२ हजार रुपये असा भाव होता. गेल्या महिनाभरापूर्वीपर्यंत १८ हजार रुपये प्रति टन असा मोसंबीचा भाव होता. परंतु महिनाभरापासून मोसंबीच्या भाव कमालीचे घसरले आहेत. सद्य स्थितीत दहा ते बारा किंवा चौदा हजारापर्यंत प्रति टनापर्यंत हे भाव उतरले आहेत.
घनसावंगी,अंबड, जालना, बदनापूर या तालुक्यात मोसंबीचे क्षेत्र आहे. घनसावंगीत सरासरी ३२०० हेक्टर, अंबड तालुक्यात ३००० हेक्टर मोसंबीचे क्षेत्र आहे. परंतु पाण्याअभावी आता मोसंबीच्या बागा सुकू लागल्या आहेत. मोसंबी पिवळ्या पडत असून, पाखरे मोसंबीचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे मोसंबीला आता मागणीच नसल्यामुळे उत्पादक कमालीचे अडचणीत आले आहेत.
सहा महिने बाग जगविण्याचा प्रश्न
४गेल्यावर्षी मे महिन्यांपर्यंत जमिनीतील पाणी पातळी बऱ्यापैकी होती. त्यामुळे उत्पादकांना बागा जगविता आल्या. परंतु यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच जमिनीतील पाणीपातळी घटल्यामुळे बागायदरांसमोर पुढील चार सहा महिने म्हणजेच पावसाळ्यापर्यंत बागा जगवाव्यात कशा असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.
५० टक्के बागा संकटात
४गेल्या दोन वर्षांपूर्वी पडलेल्या अभूतपूर्व दुष्काळामुळे जवळपास ८० टक्के बागा जळाल्या होत्या. गेल्यावर्षी बऱ्यापैकी पावसामुळे बागायतदारांनी मोठ्या उमेदीने बागा जगविल्या. परंतु यावर्षी घनसावंगी तालुक्यात गेल्यावर्षीच्या केवळ २८ टक्केच पाऊस झाल्याने बागायतदारांसमोर मोठा गंभीर पेचप्रसंग उभा राहिला आहे.