दुष्काळाने लातुरच्या दाळ उद्योगाची उलाढाल २५ टक्क्यांनी घटली
By Admin | Updated: November 20, 2014 00:48 IST2014-11-20T00:41:07+5:302014-11-20T00:48:12+5:30
सितम सोनवणे, लातूर दाळ उद्योगामुळे देशभरात आपला ब्रॅन्ड निर्माण केलेल्या लातूर जिल्ह्याच्या उद्योजकांना यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे

दुष्काळाने लातुरच्या दाळ उद्योगाची उलाढाल २५ टक्क्यांनी घटली
सितम सोनवणे, लातूर
दाळ उद्योगामुळे देशभरात आपला ब्रॅन्ड निर्माण केलेल्या लातूर जिल्ह्याच्या उद्योजकांना यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ४५ ते ५० लाख क्विंटल डाळीचे उत्पादन यंदा यात २५ टक्क्याने घटून ३० ते ३५ लाख क्विंटलवर जात आहे. यात आणखी घट होण्याची चिन्हे आहेत. ऐन मोसमात तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या दाल मिलपैकी आता ७० टक्के मिल एका शिफ्टवर आल्या आहेत.
दाळ आणि लातूरचे नाते अतूट आहे. लातूरची तूर आणि चना दाळ तर देशात प्रसिध्द होती. एका काळात विकसित झालेल्या या उद्योगात सध्या ८० ते ८५ दाल मिल एकट्या लातूर शहरात आहेत. जिल्हाभरातील हा आकडा १३० च्या घरात आहे. खरिपाने झटका दिला अणि रबीच्या पेरणीतही पावसाअभावी अनिश्चितता आली. त्यामुळे तूरीच्या उत्पादनात घट आणि हरभऱ्याचा पेरा ०.१ टक्क्यावर आला आहे. यंदा कर्नाटकातूनही होणारी तुरीची आवक रोडावली आहे. तिथूनही फक्त मुग, उडीदाचीच आवक वाढली आहे. तूर व हरभऱ्यासाठीही बाहेरच्या जिल्ह्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. परंतु बाहेरही तूर आणि हरभऱ्याचे उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यात होणारी अडीच लाख हेक्टर्स क्षेत्रावर तूर तर साडेतीन लाख हेक्टर्सवर हरभऱ्याची लागवड मंदावली आहे. याचा फटका दाय उत्पादनाला बसला आहे. लातूर जिल्ह्यातून जवळपास ४५ लाख क्विंंटल दाळ उत्पादीत केली जाते़ याचा फटका मिलचालकांना बसला असून एकट्या लातूर शहरात ७ ते ८ मिलना कुलूूप लावण्याची वेळ आली आहे. जिल्हाभरात हा आकडा २० च्या घरात जातो आहे. दररोज तीन - तीन शिफ्टवर चालणाऱ्या दाळ मिलमधील ६० ते ७० टक्के दाळ मिल या एका शिफ्टवर आल्या असल्याची माहिती हाती आली आहे.
लातूरमध्ये ८५ तर उदगीरमध्ये ४० डाळ मिल आहेत़ या दालमिलच्या माध्यमातून दररोज सरासरी १५ हजार ते २० हजार क्विंटल तूर व हरभरा डाळीचे उत्पन्न घेतले जाते़ त्यातही तुरीचा अधिक वाटा होता़ पण सध्यस्थितीत मुग व उडीद यांची आवक असल्याने १० हजार क्विंटलपेक्षाही कमी उत्पादन होत आहे़ या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम हा मनुष्यबळ तसेच एकूण सर्वच यंत्रणेवर होत असल्याने आर्थिक गती मंदावत असल्याचेही डाळ मील मालकांकडून सांगण्यात येत आहे़