चाराटंचाईमुळे पशुपालक हैराण
By Admin | Updated: July 30, 2014 01:02 IST2014-07-30T00:03:53+5:302014-07-30T01:02:54+5:30
कापडसिंगी : सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी परिसरात अत्यल्प पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

चाराटंचाईमुळे पशुपालक हैराण
कापडसिंगी : सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी परिसरात अत्यल्प पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरवर्षी जुलै-आॅगस्ट महिन्यात गवत उगवून गुरांना चारा उपलब्ध होत असतो, मात्र यंदा बिकट स्थिती निर्माण झाल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.
कापडसिंगी येथील गायरान जमिनीवर काही जणांनी कब्जा केल्याने जनावरांना चरण्यासाठी जमीन उरलेली नाही. तसेच इतर ठिकाणी अजुन गवत उगवलेले नाही. त्यामुळे जनावरे चारायची कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी जनावरांच्या चाराही शिल्लक राहिला नाही. पावसाळा सुरू होवून दोन महिने उलटले तरी शेताच्या बांधावर गवतही फुटले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चारा विकत घेऊन गुरांना टाकावा लागत आहे. वन विभागाच्या जमिनीतही चराईसाठी पैसे द्यावे लागतात.
एका गायीसाठी २५ रुपये प्रति महिना या दराने शुल्क भरुन वनविभागाकडून संबंधित शेतकऱ्याला परवानगी देण्यात येते. मात्र गुरांची संख्या अधिक असल्याने शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. घोरदरी येथील जमिनीवरही जंगल तोडून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याठिकाणीही चारा नसल्याने गुरांचे हाल होत आहेत. चाऱ्याचा प्रश्न सुटत नसल्याने आणि पशुधन सांभाळणे कठीण बनल्याने अनेक शेतकरी गुरांची बाजारात विक्री करीत आहेत. त्यामुळे या भागात गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे.
कापडसिंगी परिसरातील काही भागांमध्ये महसूल विभागाने ताब्यात घेतलेली वन जमीन गुरे चारण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
(वार्ताहर)