रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांची पैठणकडे पाठ
By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T01:32:28+5:302014-08-02T01:43:54+5:30
अनिल गव्हाणे, बिडकीन गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद ते पैठण रस्त्याची अवस्था सुधारली नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांची पैठणकडे पाठ
अनिल गव्हाणे, बिडकीन
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद ते पैठण रस्त्याची अवस्था सुधारली नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याचा परिणाम पर्यटक व भाविकांवरही झाला असून पैठणकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे.
पैठण हे दक्षिण काशी असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची गर्दी असते, तसेच औरंगाबाद जिल्ह्यात येणारे पर्यटक प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानामुळे हमखासपणे पैठणलाही भेट देतातच; परंतु हे उद्यानही भकास झाल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद-पैठण रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यात वाळूच्या वाहनांमुळे रस्त्याची पार वाट लागली आहे. यामुळे पर्यटकांनी पैठणकडे पाठ फिरविली आहे. याचा फटका व्यावसायिकांनाही बसला आहे. बिडकीन, पैठण, जायकवाडी, चितेगाव येथील व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांवर मंदी आली आहे.
धोकादायक अरुंद पूल
औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील बिडकीननजीक साई मंदिराजवळील अरुंद पुलाचे कठडे कित्येक वर्षांपासून तुटलेले असून हा अरुंद पूल धोकादायक बनला आहे. येथे अनेक वेळा अपघातही झाले आहेत. याकडे बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष झाले आहे. लोकप्रतिनिधी मात्र हा रस्ता चारपदरी, सहापदरी करण्याचे आश्वासन देत आहेत. रुंदीकरण होईल तेव्हा होईल, तूर्त आहे त्या रस्त्याची दुरुस्ती केली तरी खूप झाले, अशा प्रतिक्रिया वाहनधारक देत आहेत.
अतिक्रमणाचा विळखा
हा रस्ता आधीच अरुंद, खराब असताना यावर अतिक्रमणही वाढले आहे. बिडकीन येथे तर कायम वाहतूक ठप्प होते. याकडे पोलिसांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. एकंदरीत रस्त्याच्या जाचामुळे पर्यटकांची संख्या कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे.