विकासांमुळे माहूरगडचे सौंदर्य फुलले
By Admin | Updated: July 29, 2014 01:10 IST2014-07-29T00:36:57+5:302014-07-29T01:10:49+5:30
ईलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थानवर भाविकांसाठी सुविधांसह संस्थानकडून शहरातील जि़प़ शाळा अंगणवाड्या दत्तक घेवून त्यांची सुधारणा सुरू असून त्या चकाकणार आहेत.

विकासांमुळे माहूरगडचे सौंदर्य फुलले
ईलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूर
माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थानवर भाविकांसाठी सुविधांसह संस्थानकडून शहरातील जि़प़ शाळा अंगणवाड्या दत्तक घेवून त्यांची सुधारणा सुरू असून त्या चकाकणार आहेत. याशिवाय विविध विकास कामांमुळे माहूरगडाचे सौंदर्य चांगलेच फुलत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १८ आॅगस्ट २०१३ पासून श्री रेणुकादेवी संस्थानचा कारभार पाहण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली़ यामध्ये उपविभागीय महसूल अधिकारी अभिजित चौधरी, भवानीदास भोपी, विनायकराव फांदाडे यांचा समावेश आहे. समितीने गडावर भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांसह पिण्याचे पाणी, चेंजरूम, पायऱ्यावर शेडसह उष्णतारोधक रंग रंगोटीसह दर पौर्णिमेला भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था इत्यादी सुविधा दोन वर्षभरात ४ कोटी ८२ लाख १७ हजार ५८० रुपयांची उलाढाल करीत खर्च जाता एसबीआय बँकेत असलेल्या अकाऊंटमध्ये १ कोटी ४० लाख रुपये शिल्लक ठेवण्यात यश मिळविले आहे़
भाविकांच्या सुविधेसाठी पोलिस चौकी बनविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून अत्याधुनिक शौचालय बाथरूम, मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व संपूर्ण व्यवहार पावत्या संगणकीकृत करण्याच्या कामाला सुरुवात, मंदिर परिसराला परकोट, संरक्षक भिंतीच्या कामाला व उंबरझरा कुंडाच्या कामाला सुरुवात, चौकात हॉयमास्ट दिव्यांच्या खांबाची उभारणी, पायऱ्यावर दरवाजे गेट बसविण्यात आले तर मंदिरावर आरोग्य सुविधांसाठी अतिदक्षता विभागासह दवाखाना व रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली असून भाविकांना अत्यंत सुलभरित्या दर्शन व्हावे याची दक्षतेने रांगेच्या ठिकाणी मंदिरात भविकांच्या सुरक्षा स सुविधांची खबरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती संस्थानचे कार्यालय अधीक्षक पी़ डी़ चव्हाण यांनी खास लोकमतला दिली़
संस्थानवर १८ आॅगस्ट २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती़ त्याच आदेशानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयाने नवीन आदेश देवून ११ सदस्यीय समिती नेमली़ त्यात अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश उपाध्यक्ष म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी, सचिवपदी उपविभागीय महसूल अधिकारी तर कोषाध्यक्ष म्हणून तहसीलदार माहूर यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सात सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ यात चंद्रकांत बाबूराव भोपी, भवानीदास रेणुकादास भोपी, श्रीपाद भार्गवराव भोपी, विनायकराव नारायणराव फांदाडे, आशिष गुणवंतराव जोशी, समीर किरण भोपी, संजय रामभाऊ काण्णव यांची निवड करण्यात आली. सदर निकालाची न्यायालयीन प्रक्रिया सध्यातरी संपुष्टात आली नाही़
श्री रेणुकादेवी संस्थानवरील त्रिसदस्यीय समितीने धार्मिक कार्यासह सामाजिक कार्यातही मोठा वाटा उचलून शहरातील ७५० विद्यार्थीसंख्या असलेल्या जि़ प़ कें़ प्रा़ शाळेला ५ लाख रुपये अनुदान देवून रंगरंगोटी बेंच तसेच गेट बसवून दिला असून शहरातील अवकळा आलेल्या तीन अंगणवाड्यांनाही दत्तक घेवून त्यांचेही सुशोभिकरण करून पूर्ण सुविधा पुरविल्याने त्रिसदस्यीय समितीचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय जोशी यांनी स्वागत केले़
संस्थानच्या खात्यात १ किलो सोने
श्री रेणुकादेवी संस्थानला दानपेटीच्या माध्यमातून ९३ लाख ७४ हजार ४२९ रुपये, पातळ विक्रीतून ५३ लाख ६९ हजार ८९५ रुपये, तांबूल विक्रीतून १ लाख ४७ हजार , पूजाकरातून १ लाख, खन बांगड्या फोटो हर्रासीतून १ लाख २५ हजार, तांदूळ विक्रीतून २५ हजार तसेच भाविकांनी मातेला अर्पण केलेले सोने १ किलो २५१ ग्रॅम, चांदी १९ किलो ३४३ ग्रॅम तर विनापावती परशुराम मंदिराच्या पाळण्याला बांधण्यात आलेली ३ किलो ७६६ गॅ्रम चांदी दान स्वरूपात संस्थानच्या खात्यात जमा करण्यात आली.