‘पदवीधर’ च्या आचारसंहितेमुळे कामकाज ठप्प

By Admin | Updated: May 22, 2014 00:36 IST2014-05-22T00:21:26+5:302014-05-22T00:36:29+5:30

हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता २१ मे पासून संपूर्ण मराठवाडाभर लागू झाली आहे.

Due to the Code of Graduate's Code of Conduct | ‘पदवीधर’ च्या आचारसंहितेमुळे कामकाज ठप्प

‘पदवीधर’ च्या आचारसंहितेमुळे कामकाज ठप्प

हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता २१ मे पासून संपूर्ण मराठवाडाभर लागू झाली आहे. परिणामी पुन्हा एकदा सर्व विकास कामे ठप्प होणार आहेत. लोकसभेची आचारसंहिता ५ मार्च रोजी लागू झाल्यानंतर ती १७ मे रोजी संपुष्टात आली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून ठप्प झालेली विकास कामे पुन्हा सुरू होतील, असे वाटप होते. मराठवाडा पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता २५ मे नंतर लागू होईल, अशीही चर्चा होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम आजच जाहीर केला. त्यामुळे आपोआपच निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यानुसार २७ मे रोजी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, ३ जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ४ रोजी आलेल्या अर्जांची छाणनी होणार असून, ६ जूनपर्यंत उमेदवारी परत घेता येणार आहे. २० जून रोजी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार असून, २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच अनेक विकास कामेही ठप्प होणार आहेत. याचा तात्काळ परिणाम बुधवारी दिसून आला. जिल्हा परिषदेत जलसंधारण समितीच्या बैठकीची औपचारिकता करावी लागली. त्यामध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. सकाळी १० च्या सुमारास जि. प. च्या ५ विभागातील बदली प्रक्रियेस समुपदेशनद्वारे प्रारंभ झाला. यावेळी सीईओ पी. व्ही. बनसोडे, अतिरिक्त सीईओ अशोक सिरसे, जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, सभापती रंगराव कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे आदींची उपस्थिती होती. महिला व बालकल्याण, अर्थ, पंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम या पाच विभागाची बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याच वेळी पदवीधरची आचारसंहिता लागू झाल्याचा निरोप प्रशासनाला मिळाला. त्यामुळे आहे तशी प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आचारसंहितेचा निरोप मिळण्यापूर्वी केलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यासंदर्भात निवडणूक विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. आचारसंहिता लागू झाल्याने आता पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकांवर बंधने आली असून, पदाधिकार्‍यांकडे असलेली शासकीय वाहने जिल्हा प्रशासन ताब्यात घेणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) शिक्षकांच्या बदल्या आता जुलैमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पदवीधरची आचारसंहिता संपल्यानंतर होणार आहे. जिल्हा परिषदेकडे प्राथमिक पदवीधर व मुख्याध्यापक यांचे एकूण ३१ बदल्यांचे लेखी विनंती अर्ज आले असून, २४० प्राथमिक शिक्षकांचे बदल्यांचे विनंती अर्जही शिक्षण विभागाकडे आले आहेत. या विनंती बदल्या करण्यापूर्वी शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेल्या पाचही तालुक्यातील शिक्षकांचे त्याच तालुक्यात समायोजन केले जाणार असून, त्यानंतर होणार्‍या रिक्त जागांवर बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. शिक्षकांच्या तालुकांतर्गत प्रशासकीय बदल्या होणार की नाही? याचे चित्रही अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी ही सर्व प्रक्रिया जुलैमध्येच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Due to the Code of Graduate's Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.