गंगापुरात शासकीय कार्यालयांतील प्रभारी राजमुळे नागरिकांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:09+5:302021-07-07T04:06:09+5:30

जयेश निरपळ गंगापूर : येथील तहसील, भूमिअभिलेख कार्यालय, नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय, दस्तनोंदणी उपनिबंधक व गटशिक्षणाधिकारी आदी महत्त्वाच्या कार्यालयांचा भार ...

Due to the in-charge of government offices in Gangapur, the citizens are worried | गंगापुरात शासकीय कार्यालयांतील प्रभारी राजमुळे नागरिकांची गोची

गंगापुरात शासकीय कार्यालयांतील प्रभारी राजमुळे नागरिकांची गोची

जयेश निरपळ

गंगापूर : येथील तहसील, भूमिअभिलेख कार्यालय, नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय, दस्तनोंदणी उपनिबंधक व गटशिक्षणाधिकारी आदी महत्त्वाच्या कार्यालयांचा भार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर कार्यालयांत पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार काम पाहतात; परंतु येथील तहसीलदार अविनाश शिंगोटे यांच्यावर ९ एप्रिल रोजी एसीबीने कारवाई केली, तेव्हापासून हा कारभार नायब तहसीलदार सारिका शिंदे यांच्याकडे आहे. यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यात गौणखनिजांची अवैध वाहतूक करणारे बेलगाम झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून वाळूमाफियांना आवर कोण घालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भूमिअभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक वैशाली पाटील दोन महिन्यांपासून रजेवर असून त्यांच्या जागेवर डॉ. दृष्यंत कोळी यांच्याकडे औरंगाबादसह येथील अतिरिक्त पदभार आहे. मध्यंतरी ते देखील रजेवर असल्याने येथील कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर राहत असून त्यांना वरिष्ठांचा धाक उरलेला नाही. १ जुलै रोजी सदरील कार्यालयांचा पंचनामा करुन गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजवण्यात आल्याने या कार्यालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला होता.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांची ८ एप्रिल रोजी बदली झाली आहे तेव्हापासून हा कारभार नायब तहसीलदार बालचंद तेजीनकर यांच्याकडे असून नागरिकांची कामे रखडल्याने पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची शहरवासीयांची मागणी आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार हे अनेक दिवसांपासून सुटीवर आहेत. त्यांचा कार्यभार डॉ. गीतेश चावडा यांच्याकडे असून लसीकरणासाठी मिळणाऱ्या मर्यादित डोसचे नियोजन पाहिजे तसे होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय गट शिक्षणाधिकारी दीपाली थावरे या देखील अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. विस्ताराधिकारी विजय दुतोंडे हे सध्या प्रभारी म्हणून त्यांचे काम पाहत आहेत. या कार्यालयांना पूर्णवेळ अधिकारी नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसून, नागरिकांचे कामे खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चौकट

दस्त नोंदणी कार्यालयातही अधिकारी नाही

दस्त नोंदणी उपनिबंधक औदुंबर लाटे हेदेखील २ एप्रिल रोजी एसीबीच्या कारवाईत सापडल्याने तेव्हापासून बालाजी मदशवर यांच्याकडे या कार्यालयाचा पदभार आहे. तालुक्यातील महत्वाच्या कार्यालयांपैकी हे कार्यालय एक असून येथील कामांचा निपटारा होण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Due to the in-charge of government offices in Gangapur, the citizens are worried