राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून मनभेद मैदानात

By Admin | Updated: September 29, 2014 00:45 IST2014-09-29T00:45:22+5:302014-09-29T00:45:22+5:30

नजीर शेख, औरंगाबाद एकेकाळी गुलमंडीवर आपल्या मैत्रीची ग्वाही देणारे आणि वर्तमानपत्रांना त्यासंबंधीच्या मुलाखती देणारे मात्र मागील दीड-दोन वर्षांत एकमेकांचे राजकीय वैरी झाले

Due to the battle of political domination | राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून मनभेद मैदानात

राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून मनभेद मैदानात

नजीर शेख, औरंगाबाद
एकेकाळी गुलमंडीवर आपल्या मैत्रीची ग्वाही देणारे आणि वर्तमानपत्रांना त्यासंबंधीच्या मुलाखती देणारे मात्र मागील दीड-दोन वर्षांत एकमेकांचे राजकीय वैरी झालेले आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी हे एकदाचे एकमेकांसमोर उभे ठाकलेच. युती तुटली आणि तनवाणी यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आ. जैस्वाल यांच्या विरोधात तनवाणी भूमिका घेण्याची संधी साधली.
गुलमंडीवर राहणाऱ्या या दोन नेत्यांचे तसे पाहता कार्यक्षेत्रदेखील एकच राहिले. चंद्रकांत खैरे आमदार झाल्यानंतर आ. जैस्वाल यांनी गुलमंडीवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्याचवेळी किशनचंद तनवाणी हे त्यांच्या बरोबरीने राहिले. जैस्वाल खासदार झाल्यानंतरच्या खूप वेळानंतर म्हणजे २००४-०५ या काळात तनवाणी यांनी महापौरपद भूषविले. २००४ साली औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जैस्वाल यांचा पराभव झाल्यानंतर तनवाणी यांना आमदार होण्याचे वेध लागले. त्यांची ही इच्छा पक्षाने औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमेदवारी देऊन पूर्णही केली.
मात्र, अशा मतदारसंघातून थेट जनतेशी संबंध येत नसल्याने तनवाणी यांना त्यात फारसा रस नव्हता. विधानसभेचा आमदार होण्याची त्यांची मनीषा कायम राहिली. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यावेळी तनवाणी विधान परिषदेचे आमदार असल्याने विकास जैन यांना उमेदवारी मिळाली. जैस्वाल हे अपक्ष उभे राहून निवडून आले. त्यानंतर जैस्वाल हे पुन्हा स्वगृही परतले होते. याच काळात जैस्वाल आणि तनवाणी यांचे संबंध अधिक बिघडले.
विधान परिषदेच्या २०१३ साली झालेल्या निवडणुकीत तनवाणी यांचा पराभव झाला. हा पराभव स्पष्ट दिसत असतानाही पक्षाच्या दबावापुढे त्यांचा नाइलाज झाला होता. पराभूत उमेदवाराची मानसिकता घेऊन तनवाणी काही दिवसांपासून वावरत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे राजकारणात टिकून राहणे ही तनवाणी यांची गरज बनली असताना जैस्वाल हे त्यामधील अडथळा ठरत असल्याचा तनवाणी यांचा समज आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार दोन हजार मतांनी पिछाडीवर राहिल्यानंतर तर तनवाणी यांची आमदार होण्याची तीव्र इच्छा उफाळून आली. जैस्वाल यांना कदाचित विधानसभेचे तिकीट मिळणार नाही, असा अंदाज तनवाणी बांधत होते.
मात्र, जैस्वाल यांनाच तिकीट जाहीर झाल्याने तनवाणी यांचा पुरता बीमोड झाला. निवडणुकीची त्यांनी मोठी तयारी केली होती. प्रसंगी अपक्ष उभे राहण्याचीही त्यांची तयारी होती. तनवाणी यांना राजकीय अस्तित्वासाठी युती तुटल्याने आता भाजपाचा आधार मिळाला आहे.
या काळात दोघांमध्ये कुठेही जाहीर वाद किंवा टीकाटिप्पणी झाली नसली तरी अंतर्गत धुसफूस चालूच होती.
तनवाणी आणि जैस्वाल यांचे संबंध बिघडण्यामागे व्यावसायिक किंवा इतर काही कारणे आहेत का, याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात असला तरी हे कारण राजकीयच असल्याचे गुलमंडी परिसरात बोलले जाते. दोघे मित्र आता राजकारणाच्या मैदानात एकमेकांना मात देण्याच्या प्रयत्नात आहेत.

Web Title: Due to the battle of political domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.