वाहनाअभावी बिबट्यांचे आगमन लांबले
By Admin | Updated: January 15, 2016 00:16 IST2016-01-14T23:48:44+5:302016-01-15T00:16:43+5:30
औरंगाबाद : मनपाच्या प्राणिसंग्रहालयात आनंदवनातून येणाऱ्या बिबट्यांच्या जोडीचे आगमन वाहनाअभावी लांबले आहे. वन विभागाने काही दिवसांपूर्वीच मनपाला आनंदवनातील बिबट्यांची जोडी देण्यास मंजुरी दिली

वाहनाअभावी बिबट्यांचे आगमन लांबले
औरंगाबाद : मनपाच्या प्राणिसंग्रहालयात आनंदवनातून येणाऱ्या बिबट्यांच्या जोडीचे आगमन वाहनाअभावी लांबले आहे. वन विभागाने काही दिवसांपूर्वीच मनपाला आनंदवनातील बिबट्यांची जोडी देण्यास मंजुरी दिली. मात्र, त्यांना आणण्यासाठी मनपाला वाहन मिळेनासे झाले आहे. मनपाच्या यांत्रिकी विभागाकडून वाहनाची व्यवस्था केली जात नसल्यामुळेच बिबटे येण्यास उशीर लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मनपाच्या प्राणिसंग्रहालयात वाघ, सिंह, हत्ती यांसह सुमारे ५० पेक्षा जास्त प्रकारचे प्राणी आहेत. बिबट्यांची संख्या नगण्य नसल्यामुळे बिबट्यांची एक जोडी मिळावी यासाठी मनपा प्रशासनाने बऱ्याच दिवसांपासून वन विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार दोन-तीन महिन्यांपूर्वीच वन विभागाने आनंदवनातून मनपाला दोन बिबटे देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार आनंदवन प्रशासनानेही मनपाला बिबटे घेऊन जाण्याची सूचना केली; परंतु वाहनाची सोय होत नसल्यामुळे या बिबट्यांचे आगमन लांबले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राणिसंग्रहालय प्रशासनाने यांत्रिकी विभागाने बिबटे आणण्यासाठी गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदविलेली आहे.
मात्र, त्यांच्याकडून गाडी मिळत नसल्यामुळे बिबटे आणण्यास उशीर होत आहे. आनंदवनात बिबट्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वन विभागाने तेथील दोन बिबटे मनपाला देण्यास मंजुरी दिलेली आहे.
दोन वाघ हलविणार, दोन बिबटे येणार
मनपाच्या प्राणिसंग्रहालयातून लवकरच दोन वाघ मध्यप्रदेशात हलविले जाणार आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथील दोन वाघ मध्यप्रदेशात हलविण्याची सूचना सेंट्रल झू आॅथॉरिटीने केली होती. त्यानुसार मनपाच्या सर्वसाधारण सभेने आठवडाभरापूर्वीच तसा ठराव मंजूर केला. त्यानुसार लवकरच वाघांची एक जोडी मुकूंदपूर येथे सुरू होणाऱ्या नवीन प्राणिसंग्रहालयात दिली जाणार आहे. ही वाघांची जोडी जाण्याबरोबरच आनंदवनातून दोन बिबटे येथे येणार आहेत.