घाटीच्या दारात वृद्धेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू
By Admin | Updated: July 23, 2014 00:42 IST2014-07-23T00:33:58+5:302014-07-23T00:42:11+5:30
औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांचा ‘आधार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या दारातच एका आजारी वृद्ध महिलेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला.

घाटीच्या दारात वृद्धेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू
औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांचा ‘आधार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या दारातच एका आजारी वृद्ध महिलेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांपासून ही वृद्ध महिला घाटीच्या बाह्यरुग्ण विभागासमोर तडफडत पडलेली होती; परंतु कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून घाटी रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात दररोज येणाऱ्या शेकडो गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. अशाच एका गरीब वृद्ध आजारी महिलेला कुणीतरी चार दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर असलेल्या पत्राच्या शेडमध्ये सोडून निघून गेले. ही महिला प्रचंड आजारी होती. उठून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाह्यरुग्ण विभागातही ती जाऊ शकत नव्हती.
कुणीतरी येईल अन् आपल्याला उपचारासाठी घाटीत दाखल करील, या आशेने त्या शेडमध्येच ती तडफडत होती. शेकडो नागरिक तेथून ये-जा करीत होते. तिला पाहत होते. विशेष म्हणजे ही महिला ज्या शेडमध्ये पडलेली होती तेथेच घाटी रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी आपली चारचाकी वाहने पार्क करतात. मात्र, डॉक्टर, कर्मचाऱ्यांनाही त्या महिलेची दया आली नाही.
शेवटी उपचार न मिळाल्याने तडफडून या वृद्धेने मंगळवारी प्राण सोडला. ती हालचाल करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर घाटी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने एक अनोळखी महिला शेडमध्ये पडली असल्याची माहिती घाटीतील पोलीस चौकीला कळविली. मग पोलिसांनी या महिलेला घाटीत उपचारासाठी आणले.
तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. या अनोळखी महिलेच्या मृत्यूची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या महिलेचे प्रेत नेण्यासाठी अद्याप कुणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे प्रेत शवागृहात बेवारस पडून आहे.