‘दुधना’ची पाणीपातळी ‘जैसे थे’

By Admin | Updated: July 21, 2014 00:27 IST2014-07-21T00:11:11+5:302014-07-21T00:27:06+5:30

मोहन बोराडे, सेलू सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे़

'Dudhana' was water level 'like' | ‘दुधना’ची पाणीपातळी ‘जैसे थे’

‘दुधना’ची पाणीपातळी ‘जैसे थे’

मोहन बोराडे, सेलू
सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे़
पावसाळयाचा दीड महिना उलटला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी निम्न दुधनाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही़ त्यामुळे आगामी काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे़ गतवर्षी जालना जिल्ह्यासह सेलू परिसरात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात ६० टक्के पाणी साठविण्यात आले़ त्यामुळे उन्हाळ्यात सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवली नाही़
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात तरी समाधानकारक पाऊस होईल, ही अपेक्षा होती. परंतु, २० जुलैपर्यंत मोठा पाऊस झालेला नाही़ जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होतो़ परंतु, जालना जिल्ह्यात वरूणराजाने विश्रांती घेतल्यामुळे पाणीपातळीत दखल घेण्याइतपत वाढ झालेली नाही़ त्यामुळे सद्य:स्थितीत निम्न दुधना प्रकल्पात जिवंत साठा केवळ ३० टक्के आहे़ एकूण साठा ५० टक्के असून प्रकल्पात १७५ द़ल़घ़मी़ पाणी आहे़
गतवर्षी निम्न दुधना प्रकल्पात २३० द़ल़घ़मी़ पाणीसाठा होता़ जवळपास ७५ टक्के यातील पाणी वापरण्यात आले आहे़ तर काही पाणी बाष्पीभवनाने कमी झाले आहे़ गतवर्षी दुधना प्रकल्पात मोठयाप्रमाणावर पाणीसाठा झाल्यामुळे उजव्या कालव्याची पाणी सोडून चाचणी घेण्यात आली होती़ तसेच सेलू शहरालाही दुधनाने पाणी पुरविले आहे़ परंतु, दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पात पाण्याची वाढ झाली नसल्यामुळे आगामी काळात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे़
जालना जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी नदी, नाले कोरडे आहेत़ पावसाचे पाणी जमिनीतच आटल्यामुळे प्रकल्पात पाणी आलेले नाही़ त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ न होता उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे़
गतवर्षी प्रकल्पात चांगला पाणी साठा झाल्यामुळे यावर्षी प्रकल्प पूर्ण भरून पाण्याचा सिंचनासाठी वापर होईल, ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे़ परंतु, पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचे संकट ‘आ’ वासून उभे टाकले आहे़
प्रकल्पात ३० टक्के जिवंत साठा
निम्न दुधना प्रकल्पात सद्य:स्थितीत ५० टक्के पाणीसाठा असला तरी ३० टक्के जिवंत पाणीसाठा आहे़ गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला होता़ परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून पाणी पातळीत वाढ झालेली नाही़ प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्यास उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडणे शक्य होणार नाही़ त्यामुळे प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना पाऊस झाल्याशिवाय होणार नाही़ त्यामुळे जालना जिल्ह्यासह सेलू तालुक्यात वरूणराजाने बरसावे, हीच अपेक्षा सर्वांची आहे़

Web Title: 'Dudhana' was water level 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.