अस्वस्थतेतून ‘औषध’ लघुपटाची निर्मिती
By Admin | Updated: June 29, 2017 00:14 IST2017-06-29T00:10:57+5:302017-06-29T00:14:10+5:30
परभणी : ग्राहकांचे चेहरे वाचता वाचता जी अस्वस्थता वाटायला लागली, त्यातूनच ‘औषध’ या लघुपटाची निर्मिती झाली़, असे मत अमोल देशमुख यांनी व्यक्त केले़

अस्वस्थतेतून ‘औषध’ लघुपटाची निर्मिती
त्र्यंबक वडसकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सामाजिक व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था व आपले अज्ञान यातून अस्वस्थता जाणवत होती़ माझ्या फार्मसी व्यवसायात येणाऱ्या ग्राहकांचे चेहरे वाचता वाचता जी अस्वस्थता वाटायला लागली, त्यातूनच ‘औषध’ या लघुपटाची निर्मिती झाली़, असे मत अमोल देशमुख यांनी व्यक्त केले़
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘औषध’ या लघुपटाचे दिग्दर्शक अमोल देशमुख हे परभणी येथे ‘चित्रपट रसास्वाद’ या कार्यक्रमासाठी आले असता, ‘लोकमत’शी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या़ ‘औषध’ या लघुपटाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, एका म्हातारीला चुकीच्या गोळ्या दिल्या गेल्या, ही गोष्ट रात्री उशिरा लक्षात आल्यानंतर त्या म्हातारीच्या घराचा शोध घेत मानवी नातेसंबंधावर प्रकाश टाकत औषधी क्षेत्रातील जबाबदारी या लघुपटातून ठळक केली आहे़ या क्षेत्राकडे कसे वळलात? असे विचारले असता, त्यांनी सांगितले, लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमाची व नाटक करण्याची आवड होती़ पुढे फार्मसीच्या व्यवसायात स्थिर झाल्यानंतर माझ्यातील कलावंत शांत बसू देत नव्हता़
त्यातून आरबाड फिल्म क्लब पुणे यांच्या पहिल्या वर्कशॉपचा मी पहिला विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण घेतले़ प्रसिद्ध दिग्दर्शक समर नखाते, उमेश कुलकर्णी व संकलन रिमा कौर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण केले़
या १५ वर्षात डिजीटल क्रांती झाली असून, पूर्वी शहरातच असलेला कॅमेरा आता घराघरात जावून पोहचला आहे़
ग्रामीण भागातील लोकांची अनुभव संपन्नता खूप मोठी आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी घाई न करता अगोदर तांत्रिक प्रशिक्षण घेऊनच यावे, असेही देशमुख यांनी सांगितले़