औषध निर्माण अधिकाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: June 24, 2014 00:40 IST2014-06-24T00:40:25+5:302014-06-24T00:40:25+5:30
लातूर : औषध निर्माण अधिकाऱ्यांनीविविध प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.

औषध निर्माण अधिकाऱ्यांचे आंदोलन
लातूर : सार्वजनिक आरोग्य सेवेतील औषध निर्माण अधिकाऱ्यांनी केंद्र शासनाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी तसेच विविध प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. आंदोलनात सार्वजनिक आरोग्य सेवेतील शंभरहून अधिक औषध निर्माण अधिकारी सहभागी झाले होते.
सार्वजनिक आरोग्य सेवेतील औषध निर्माण अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी दिली जात नाही. शिवाय, संपूर्ण सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती पर्यंत एकाच पदावर कार्यरत रहावे लागते. शिवाय, वेतन श्रेणीचाही लाभ नाही. या सर्व मागण्यांसाठी औषध निर्माण अधिकाऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. लातुरात शंभराहून अधिक औषध निर्माण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दिवसभर धरणे आंदोलन केले. जोपर्यंत शासन औषध निर्माण अधिकाऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे सुरू राहणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी सेवेवर घेण्यात येणारे औषध निर्माण अधिकाऱ्यांना अनुभवाच्या आधारे नियमित पदावर त्यांच्या नियुक्त्या सरसकट करण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली. शासनाने आश्वासन दिले आहे. पण त्याची ठोस कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे औषध निर्माण अधिकारी संवर्गात असंतोष वाढला असल्याचे निमशासकीय औषध निर्माता संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख आय. वाय. आवाळे यांनी सांगितले. आंदोलनात एस. बी. कुलकर्णी, बी. जी. मिसर, आर.डी. मालशेटवार, बी. एम. चेंडके, आय. वाय. आवाळे यांचा सहभाग होता.