बोगस डॉक्टरांनाही होतोय औषध पुरवठा
By Admin | Updated: August 3, 2014 01:14 IST2014-08-03T00:30:06+5:302014-08-03T01:14:03+5:30
नांदेड : अनेक वैद्यकीय व्यावसायिकांकडे औषधविक्रीचा कुठलाही परवाना नसताना त्यांना ठोक औषध विक्रेत्यांकडून सर्व प्रकारच्या औषधांचा पुरवठा केला जात आहे़
बोगस डॉक्टरांनाही होतोय औषध पुरवठा
नांदेड : अनेक वैद्यकीय व्यावसायिकांकडे औषधविक्रीचा कुठलाही परवाना नसताना त्यांना ठोक औषध विक्रेत्यांकडून सर्व प्रकारच्या औषधांचा पुरवठा केला जात आहे़ ही बाब बेकायदेशीर असून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे़ त्यामुळे या ठोक औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करावे, अशी मागणी यूआरपी हेल्थकेअर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे़
याबाबत संघटनेने अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांना निवेदन दिले आहे़ बोगस डॉक्टरांसह विविध पॅथीच्या डॉक्टरांना अवैधपणे करण्यात येणाऱ्या औषध पुरवठ्यामुळे चुकीचा वापर होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे़ विशेष म्हणजे कारवाई होत नसल्यामुळे हे ठोक विक्रेते डॉक्टरांना स्त्रीभ्रूृण हत्येसाठी लागणारी, झोपेची, गुंगीची, नशेची आदी औषधी बिनदिक्कतपणे पुरवठा करतात़ नियमानुसार ज्यांनी ही औषधी प्रिस्क्राईब करता येत नाहीत अशा विविध पॅथीसह बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना अनिर्बंधपणे औषधपुरवठा करणाऱ्या औषध विक्रेत्यांनी मोठे जाळे निर्माण केले आहे़
याबाबत कोल्हापूर एफीडीएने कारवाईही केली होती़ त्यामुळे या ठोक औषध विक्रेत्यांचे रेकॉर्ड तपासावे तसेच रुग्णांची आर्थिक लूट व पिळवणूक करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे़
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष उमेश खके, लोकसेवा मिशन फार्मासिस्टचे अध्यक्ष प्रसाद वाघमोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)