दुष्काळी अनुदान लाटणाऱ्यांची गय करणार नाही
By Admin | Updated: July 13, 2016 00:43 IST2016-07-13T00:24:23+5:302016-07-13T00:43:10+5:30
औरंगाबाद : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेले दुष्काळी अनुदान लाटणारे बनावट लाभार्थी आणि त्यांना मदत करणाऱ्या महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही,

दुष्काळी अनुदान लाटणाऱ्यांची गय करणार नाही
औरंगाबाद : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेले दुष्काळी अनुदान लाटणारे बनावट लाभार्थी आणि त्यांना मदत करणाऱ्या महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.
दुष्काळी अनुदानापासून जिल्ह्यातील अनेक गरजू शेतकरी अद्याप वंचित असताना गंगापूर तालुक्यातील काही महाभागांनी ३ ते १५ वेळा अनुदानाच्या रकमेवर डल्ला मारला आहे.
शिरेसायगाव आणि गवळीशिवरा सजाचे तलाठी जे. के. सोनवणे, व्ही. व्ही. कंसार, ज्ञानेश्वर नजर यांनी लाभार्थ्यांच्या बनावट याद्या तयार करून दुष्काळी अनुदानाची खिरापत वाटली होती. विशेष शेतकरी नसणाऱ्यांची नावेही या याद्यात घुसडण्यात आली होती. काही बनावट लाभार्थी तर परजिल्ह्यातील होते. तसेच मृत व्यक्तींच्या नावानेही अनुदान लाटण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आपले कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांची बँक खाती उघडून अनुदानाच्या रकमा या खात्यांमध्ये वर्ग करून घेतल्या होत्या.
‘दुष्काळातही धुतले हात’ या मथळ््याखाली ‘लोकमत’च्या १२ जुलै रोजीच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध करून सव्वा कोटी रुपयांचा अनुदान घोटाळा चव्हाट्यावर आणला. या वृत्ताने खळबळ उडाली. अनुदान घोटाळ््याची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी जिल्हा प्रशासनास दिले.
शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान शेतकरी नसणाऱ्या बनावट लाभार्थ्यांना वाटप करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे विभागीय आयुक्त दांगट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनुदान लाटणारे बनावट लाभार्थी तसेच त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा करणारे महसूल आणि जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारीही तेवढेच दोषी आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या कोणाचीच गय केली जाणार नाही. जिल्हा बँकेने त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून, महसूल खात्यातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरदेखील लवकरच कारवाई केली जाईल, असे दांगट यांनी स्पष्ट केले.