बांधकाम मजुरांनाही दुष्काळाचा फटका
By Admin | Updated: April 15, 2016 00:38 IST2016-04-15T00:07:30+5:302016-04-15T00:38:48+5:30
कडा : आष्टी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून पडलेल्या भयावह दुष्काळामुळे पाणी प्यायलाही मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच महसूल विभागाने वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे.

बांधकाम मजुरांनाही दुष्काळाचा फटका
कडा : आष्टी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून पडलेल्या भयावह दुष्काळामुळे पाणी प्यायलाही मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच महसूल विभागाने वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे. या दोन्ही कारणांमुळे बांधकाम व्यावसायिक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुष्काळामुळे इतर कोणती कामेही मिळणे कठीण झाले आहे.
महसूल विभागाने वाळू उपसा करण्यावर घातलेल्या बंदीमुळे हातात थापी, ओळंबा घेणारे गवंडी तर याच गवंड्याच्या हाताखाली माल कालवून विटा देणारा बिगारी या दोघांच्याही हाताला आता काम नसल्याने प्रपंच कसा चालवायचा? हा मोठा प्रश्न उभा ठाकला असल्याने तालुक्यातील शेकडो बांधकाम व्यावसायिक व बिगारी काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
तालुक्यात हातावर पोट भरणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हातात कोयता घेऊन ऊसतोडणीसाठी जाण्यापेक्षा गावातच गवंडी काम बिगारी काम करून याच पैशावर लेकरा-बाळांचे शिक्षण करून प्रपंच गाडा चालवला जातो. पण निसर्गाच्या अवकृपेने आणि वरूण राज्याच्या वक्रदृष्टीने पावसाने दडी मारल्याने पिण्यासाठी पाणी नाही तर बांधकामाला कुठून येणार ज्याच्याकडे थोडेफार काम करण्यापुरते पाणी आहे. असे असताना महसूल विभागाने आता वाळू उपसा करणाऱ्यांवर बंदी घातल्याने वाळू व पाण्या अभावी काम मिळेनासे झाल्याने गवंडी व बिगारी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर ऊसतोडणी मजूर गावोगाव परतल्याने त्यांच्याही समोर काम नसल्याने आता पोटापाण्यासाठी काय करायचे? असा यक्ष प्रश्न उभा रहात आहे.
सरकार आता हाताला काम देत नसल्याने अनेकांनी आपल बिऱ्हाड पुणे, मुंबई, नगर, नाशिक, औरंगाबाद, अशा ठिकाणी हालवण्यास सुरुवात केल्याने आता तरी शासनाने याकडे गांभीर्याने पाहावे व महसूल विभागाने नियमाप्रमाणे वाळू उपसा करून द्यावा, शासकीय प्रोसेस नुसार वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांकडून रॉयल्टी घ्यावी व आमच्या होणाऱ्या उपासमारीची दखल घ्यावी नसता आष्टी तहसील कार्यालयावर ओळंबा, थापी, पाटी, मोर्चा काढणार असल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुकाध्य्क्ष दिपक गरु ड यानी सांगितले. (वार्ताहर)
तालुक्यातील काही ठिकाणी मोठी बांधकामे टप्प्याटप्प्याने केली जात होती. मात्र आता पाणी नसल्यामुळे बांधकामे बंद आहेत.